शिरूर प्रतिनिधी : एक लाख रुपयांची गुंतवणूक करा आणि दरमहा आठ ते दहा टक्के परतावा मिळवा अशा आकर्षक आमिषाला बळी पडलेल्या हजारो गुंतवणूकदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीने खळबळ उडवून दिली असुन या बहुचर्चित सिस-पे (CIS Pay) आर्थिक फसवणूक प्रकरणात आता शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे कार्यरत असलेले तलाठी दशरथ विठ्ठल रोडे यांना अहिल्यानगर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने श्रीगोंदा येथून अटक केली आहे.
न्यायालयाने त्यांला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या कारवाईमुळे महसूल विभागासह शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शासनाच्या महसूल यंत्रणेत तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या रोडे यांच्यावर सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात कारवाई झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले असून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून आरोपीकडून आर्थिक व्यवहारांची साखळी गुंतवणुकीचे स्वरूप आणि या प्रकरणातील इतर संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत तपास केला जाणार आहे.

आठ ते दहा टक्के परताव्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांना
सिस-पे, इन्फिनिटी, बिकन आणि ग्लोबल ट्रेडिंग आदी कंपन्यांच्या माध्यमातून अवास्तव परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक गोळा केल्याचा आरोप आहे.
सुरुवातीच्या काळात काही गुंतवणूकदारांना परतावा देऊन विश्वास संपादन करण्यात आला त्यानंतर हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक जमा करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी नितीन अंबादास गांगर्डे (रा. मांदळी, ता. कर्जत) यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने पुढील तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
९८ जनांसह संचालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले असून
या आर्थिक फसवणूक प्रकरणात कंपनीचे संचालक, एजंट आणि अन्य संबंधित व्यक्तींविरोधात कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत अनेक संशयितांना अटक करण्यात आली असून या प्रकरणात संचालकांसह श्रीगोंदा तालुक्यातील एकूण ९८ जणांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे .
या प्रकरणातील काही आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती आता तलाठी दशरथ रोडे यांच्या अटकेमुळे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र त्यांची नेमकी भूमिका काय होती आणि आर्थिक व्यवहारांमध्ये त्यांचा सहभाग किती होता हे पोलीस तपासातून स्पष्ट होणार असून
परदेशात फरार आरोपीला भारतात आणले जाणार असून .
या प्रकरणातील आरोपी राहुल काळोखे परदेशात फरार झाला होता महाराष्ट्र पोलिसांच्या प्रस्तावानंतर इंटरपोलमार्फत त्याच्याविरोधात रेड नोटीस जारी करण्यात आली तो फिजी येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तेथील यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ३० जुलै रोजी त्याला भारतात आणण्यात आले
या घडामोडींमुळे आर्थिक फसवणुकीचे जाळे किती व्यापक होते याची कल्पना येते या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना आणखी कोणाची नावे समोर येतात याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे
११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला शासनाची मंजुरी मिळाली आहे.
गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली रक्कम वसूल करण्याच्या दृष्टीने आर्थिक गुन्हे शाखेने संबंधित एजंटांच्या सुमारे ११५ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिल्याची माहिती समोर आली असून संबंधित मालमत्तांवर शासनाचे नाव नोंदवून त्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.
तपासादरम्यान आणखी मालमत्तांची माहिती समोर आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने सुमारे ६० कोटी रुपयांच्या अतिरिक्त मालमत्ता जप्तीसाठी पुरवणी प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे.या प्रस्तावालाही मंजुरी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गुंतवणूकदारांचे पैसे कधी परत मिळणार?
या प्रकरणात ११५ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्तीला मंजुरी मिळाली असली, तरी प्रत्यक्ष मालमत्तांची विक्री रक्कम वसुली आणि त्यानंतर गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याची प्रक्रिया कधी पूर्ण होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

हजारो गुंतवणूकदारांनी मोठ्या परताव्याच्या आशेने गुंतवलेली रक्कम परत मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
तलाठी दशरथ रोडे यांच्या अटकेनंतर तपासाला कोणते नवे वळण मिळते आणखी कोणाचे आर्थिक व्यवहार तपासाच्या कक्षेत येतात आणि गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष दिलासा कधी मिळतो हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

एकीकडे महसूल विभागातील जबाबदार पदावर काम करण्याची भूमिका आणि दुसरीकडे आर्थिक फसवणूक प्रकरणात झालेली अटक यामुळे या प्रकरणाने शिरूर तालुक्याचे लक्ष वेधले आहे.




Users Today : 179
Users Yesterday : 79