एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात संपन्न

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी:
मोहनवाडी, येथील एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रांगणात ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्ती पूर्ण वातावरणात साजरा झाला. या शुभप्रसंगी भारतीय सेना दलाचे रिटायर सुभेदार मेजर श्री. सुनील मोरे, सुभेदार श्री. हनुमंत बर्गे , नायब सुभेदार श्री. मारुती चव्हाण, हवालदार श्री भीमराव गोळे आणि शाळेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मणराव देवकर, सचिव श्री. संदीप देवकर व इंद्रायणी शिक्षण संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. मंगला देवकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गायली व प्रेरक आणि चमकदार भाषणांनी उपस्थितांना प्रभावित केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी उत्कटतेने आणि परिपूर्णतेने भारलेल्या कवायतींचे सादरीकरण केले.


सीबीएससी बोर्ड व पूर्व प्राथमिक सत्रातील बालचमुन्नी स्वतंत्र भारताच्या नेत्यांची वेशभूषा करून देशप्रेम प्रदर्शित केले. यावेळी सादर केलेले काश्मीर ,राजस्थान ,गुजरात महाराष्ट्र, केरळ या राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. प्राथमिक आणि माध्यमिक सत्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या स्फूर्तीदायक गाण्यांतून, नृत्यातून जवानांच्या शौर्याला सलाम केला. यावेळी देशभक्तीपर सादर करण्यात आलेली “ट्रिब्यूट टू सोल्जर्स” ही संगीतमय नाट्यछटा पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरारले व देशभक्तीने अंगावर शहारे उमटले आणि “भारत माता की जय ” या जयघोषाने संपूर्ण शाळा परिसर दुमदुमला. यावेळी “तंबाखू मुक्त भारत” ही प्रतिज्ञा घेण्यात आली.

प्रमुख पाहुणे सुभेदार मेजर श्री. सुनील मोरे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी बहुमूल्य मार्गदर्शन केले आणि भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्था याबद्दल माहिती देताना विद्यार्थ्यांची कर्तव्ये ही नमूद केली. सीमेवर असो अथवा सामान्य जीवनात शिस्त आणि नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे सोशल मीडियाबद्दलचे वेड व अतिवापर या गंभीर समस्येवर भाष्य करत पालकांना दक्ष राहण्याचा इशाराही दिला.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना शाळेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण देवकर यांनी ‘स्वातंत्र्याचा’ खरा अर्थ विद्यार्थ्यांना सांगितला. ते म्हणाले, स्वातंत्र्य म्हणजे केवळ आपला अधिकार नसून प्रामाणिकपणाने वागून राष्ट्रहिताला प्राधान्य देणे ही आपली जबाबदारी आहे. आपले विचार समृद्ध करणे व त्यानुसार वागणे तसेच भ्रष्टाचारापासून स्वतःला दूर ठेवून देशहिताचा विचार आपले प्रथम कर्तव्य आहे .

यावेळी त्यांनी देशातील आजच्या परिस्थितीवर मार्मिक भाष्य केले. मुख्याध्यापिका सौ. प्रसिदा रविशंकर यांनी हा सोहळा संस्मरणीय बनवण्यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सांघिक कार्याचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना भविष्यात देशसेवा करण्यासाठी प्रोत्साहन दिले. या सोहळ्यास विद्यार्थ्यांसह पालक आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली . विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून सोहळ्याची सांगता झाली.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 9 0 9 2
Users Today : 9
Users Yesterday : 377