सामुहिक आक्रोश, विद्रोह आणि वेदनेचा हुंकार

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी :
महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक प्रा. बाळासाहेब लबडे हे आजच्या पिढीचे दमदार लेखक आहेत. त्यांची आजपर्यंत 18 पुस्तके प्रकाशित आहेत. यात एक कैफियत, ब्लाटेंटिया, पिपिलिका मुक्तीधाम, शेवटची लावोग्राफिया, चिंबोरेयुद्ध, काळमेकर लाईव्ह आणि मुंबई मुंबई बॉम्बे ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत. मोजकेच पण दर्जेदार लेखन हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्ये आहे. त्यांच्या या साहित्याला महाराष्ट्रातील नामवंत साहित्य संस्थानचे अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. याशिवाय त्यांच्या साहित्याचा अभ्यासक्रमात देखील समावेश आहे. यात प्रथम वर्ष कला वर्गासाठी त्यांच्या कविता मुंबई विद्यापीठात आहेत तर एम ए भाग दोन साठी त्यांचे संदर्भ पुस्तक पुणे विद्यापीठात आहे. दरवर्षी वृत्तपत्रे मासिके नियतकालिके आणि दिवाळी अंकात त्यांची नियमित लेखन असते.
लेखक बाळासाहेब लबडे हे मराठी वाचकांसाठी माधव कौशिक यांची निवडक कविता हा सुंदर काव्यसंग्रह घेऊन आले आहेत. या काव्यसंग्रहात एकूण 54 कवितांचा समावेश आहे. आत्मनिष्ठने सत्याला नेत्याला प्रामाणिकपणे सामोरे जाणाऱ्या प्रत्येक माणसास हा काव्यसंग्रह लेखकाने अर्पण केला आहे. यावरूनच लबडे यांचा मार्ग किती साधा सोपा आणि सरळ आहे हे स्पष्ट होते.
ज्येष्ठ हिंदी कवी माधव कौशिक यांच्या कवी के मन से या निवडक कविता संग्रहातील कवितांचा अनुवाद करताना कवी लबडे हे त्या कवितेशी इतके समरस झालेत की तो अनुवाद न राहता दोन्ही कवी एक होऊन जातात. इतक्या या कविता मराठीत जुळून आल्या आहेत. जणू काही या रचना मुळातच मराठी आहेत असे वाचकांना कविता वाचताना नकळतपणे वाटून जाते. खरंतर अनुवाद ही सोपी गोष्ट नाही. कवीने मांडलेली शब्दरचना ही जशीच्या तशी मांडून उपयोग नाही. तर त्यातला आशय, विषय आणि भाव हे त्यात जसेच्या तसे उतरले पाहिजे. पण लबडे हे मुळातच हाडाचे कवी आहेत. संवेदनशीलता जपणारा हा कवी शब्दांची कुठेही मोडतोड न करता कवीचा भाव जशाच्या तसा त्याने मराठी वाचकांना उपलब्ध करून दिला आहे. हे कवीचे यश म्हणावे लागेल.
बाळासाहेब लबडे हे केवळ कविता करणारी कवी नसून तर कविता जगणारी कवी आहेत. माधव कौशिक यांची कविता त्यांच्या काळजात उतरली आहे त्यामुळे या कविता अस्सल मराठीत असल्याचा आपल्याला अनुभव देतात. तसेच वाचकाला त्या प्रसंगाशी एकरूप करून कविता वाचण्याची आनंदानुभूती देण्याची ताकद लबडे यांच्या साहित्यात आहे. मुळातच ग्रामीण भागात वावरणारा हा कवी समाजातील उपेक्षित वर्गाचे दुःख जाणणारा आहे. त्यांच्या समस्या त्याला माहित आहेत. भांडवलदार वर्गाकडून होणारी शोषण त्याने स्वतः डोळ्यांनी पाहिल्यामुळे लोकशाहीचा गळा चिरणाऱ्या या वर्गाविरुद्ध अधिक स्फोटक होतो. त्यामुळे त्याच्या कविता आरशासारख्या पारदर्शक असून त्या व्यवस्थेला न घाबरता त्यांच्यापुढे आरशाप्रमाणे स्पष्ट व्यक्त होतात. हे लबडे यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
कवीची हतबलता या पहिल्याच कवितेत या कवितांची दाहकता आपल्या लक्षात येते. ती वाचून माणूस विचारमंथन तर करतोच शिवाय एका वेगळ्या उंचीवर जाऊन शून्य होऊन जातो. इतका की त्या कवितेतच गुरफटून तो सुन्न होतो. पुढे आता नेमकं काय वाढलं आहे या विचारात तो गढून जातो. इतकी ही कविता वाचकाच्या मनावर खोलवर रुजून घर करते.


आई या कवितेत मुलाच्या आई विषयी असणाऱ्या आर्त भावना कवीने व्यक्त केल्या आहेत. आईला जाऊन जवळजवळ पंचवीस वर्षे झाली परंतु तिच्या आठवणीत कवी अजूनही त्याच ठिकाणी उभा आहे, तिच्या शोधात. ही 25 वर्ष त्याला एवढे जाणवतात की युगांयुगे तो तिची वाट पाहत तिथेच उभा आहे. हा कठीण काळ कवीने अतिशय दुःखात काढला आहे. ही वेदना आई शिवाय कुणालाच समजू शकत नाही असे तो म्हणतो.
चला स्वप्ने बघूया या कवितेत वेदनेच्या गर्तेत कवीला खडकावरील हिरवळही कुठे दिसत नाही. त्यामुळे कवी व्यतीत आहे. दुःखाच्या सागरात बुडाल्यानंतर सुखाचा क्षण अनुभवायला यावा, यासाठी तो वाट पाहत आहे कारण त्याला कोणीतरी म्हणाली होते चला स्वप्ने बघूया.
कॅन्डल मार्च या कवितेत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या कृत्याचा कवीने निषेध केला आहे. मोठ्या असामी व्यक्तीने गरिबाच्या आयुष्यात असणारी उरलीसुरली इज्जतही लुटून नेली आहे. या अन्यायावर दाद मागायला किंवा त्यावर वाचा फोडायला जागा नाही. त्यामुळे सामान्य माणूस मेणबत्ती हातात घेऊन मूक मोर्चा काढून त्याचा निषेध करतोय. ही गोष्ट एवढी भयानक आहे की कवी म्हणतो, आज परत एकदा बंदुकीची गोळी बापूंच्या काळजावर लागली आणि भारताचा तिरंगा सुद्धा मान खाली घालून रडत आहे.
दिल्ली येथील सर्व भाषा पब्लिकेशन यांच्या नावाजलेल्या प्रकाशनने या पुस्तकाची साजेशी बांधणी केली आहे. पुस्तकाची गुणवत्ता आणि पानांचा दर्जा त्यांनी केलेल्या मेहनतीची साक्ष देतो. सर्व भाषा पब्लिकेशन नवी दिल्ली यांनी विषयाला अनुरूप काढलेले आकर्षक मुखपृष्ठ पुस्तकाच्या उंचीत मोलाची भर टाकते. बाळासाहेब लबडे यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा.

[सचिन बेंडभर
केंद्रीय कार्यकारणी सदस्य,
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे.]

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 7 1 6 9
Users Today : 4
Users Yesterday : 7