शिरूर प्रतिनिधी:
लेखिका मिना अशोक म्हसे या जगतापवाडी शाळेतील एक उपक्रमशील शिक्षिका आहेत. औषधी वनस्पतींचे उपयोग आणि महत्त्व हे पुस्तक संपादित केल्यानंतर त्यांचे स्वलिखित निरागस मने हे दुसरे पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे. शिक्षिका म्हणून लहान मुलांमध्ये वावरताना त्यांचे भावविश्व विचारात घेऊन त्यांनी त्यांच्या वयोगटाला साजेशा अशा सुंदर कथांचा संग्रह तयार केला आहे. या कथासंग्रहात एकूण नऊ कथांचा समावेश आहे. सर्वच कथा वाचनीय असून मुलांना रुचतील पचतील आणि आवडतील अशाच आहे. यात कुठेही बोजडपणा किंवा कृत्रिमपणा आढळत नाही. इतक्या त्या सहज सुंदर शैलीत साकार झालेल्या आहेत.

या कथासंग्रहातील जवळजवळ सर्वच कथा दर्जेदार वृत्तपत्रे, मासिके आणि दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या आहेत. लहानग्यांना ज्ञान आणि मनोरंजन देणाऱ्या या हलक्याफुलक्या कथा बालमनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. म्हसे यांनी रोजच्या दैनंदिन जीवनातील कथांचे वेगवेगळे विषय निवडल्याने बालवाचकांना ते आपले वाटतात. त्यामुळे ते त्यात हरकून जातात. इतके की पुस्तक कधी संपले याचे त्यांना भानही राहत नाही. बालवाचकांना वाचण्याची गोडी लावण्यासाठी अशा प्रकारची पुस्तके ग्रंथालयात असणे आवश्यक आहेत. त्यामुळे मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी होऊन निश्चितच बालचमू पुस्तकाकडे वळतील.
निरागस मने या पहिल्याच शीर्षक कथेतून लेखिकेने आपल्या लिखाणाची चुणूक दाखवली आहे. शाळेच्या समोर असलेल्या झाडावर अनेक पक्षी बसले होते. झाडाची फळे खाल्ल्यानंतर त्यांचा चिवचिवाट मुलांना ऐकू येत होता. अनुष्काने हे हेरले. तेव्हा त्यांना काय बरं झाले असावे असे तिला वाटले. कदाचित त्यांना तहान तर लागली नसेल अशी कल्पना तिच्या मनात आली. कारण उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची आजूबाजूला चणचणच होती. आणि मग पक्षांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागू नये म्हणून त्यांनी आपल्या शाळेत पक्षांना पाण्याची सोय करायचे ठरवले. मग त्यांनी सरांच्या मदतीने काय केले असेल हे पाहण्यासाठी बाल मित्रांनो आपल्याला ही कथा वाचावीच लागेल.

परीला पाळीव प्राण्यांची आवड होती. तिने कुत्राही पाळला. त्याचे नाव ठेवले मोत्या. मोत्या सर्वांचा आवडता होता. बाबा रोज त्याला फिरायला घेऊन जायचे. परी रोज त्याच्याबरोबर खेळायची. एक दिवस परी आणि तिच्या आई बाबा फिरायला गेले होते. मोत्या आजूबांबरोबर घरीच होता. त्या रात्री त्यांच्या घरी चोर आले. तेव्हा मोत्यांनी आपल्या हुशारीने चोरांना कसे पळून लावले हे या कथेत लेखिकेने सुंदररित्या रंगवले आहे. ही गंमत पाहण्यासाठी बाल मित्रांनो आपल्यालाही कथा वाचावीच लागेल.
धाडसी बंडू ही कथा एका गरीब कुटुंबातील प्रामाणिक मुलाची आहे. बंडू आपल्या मित्रांबरोबर यात्रेला शेजारच्या गावात गेला. यात्रेत फिरून झाल्यावर एका ठिकाणी तो स्थिरावला. तेव्हा अचानक मित्र पुढे निघून गेले आणि तो यात्रेत चुकला. जेव्हा तो भानावर आला तेव्हा अंधार पडला होता. यात्रेकरू सामानाची आवरावर करत होते. अशावेळी जायला कोणतेही साधन नसल्याने बंडू चालत चालत आपल्या गावाकडे निघाला. तेव्हा अचानक अंधारात त्याला घुंगरांचा आवाज आला. मग पुढे काय झाले हे पाहण्यासाठी आपल्याला ही कथा वाचावीच लागेल. अतिशय रंगतदार असणारी ही कथा बालवाचकांना वाचनाचा खरा आनंद देऊन जाते.

पाण्याचे महत्व या कथेत लेखिकेने अंजनीच्या उदाहरणातून पाण्याची बचत करण्याचा संदेश बालवाचकांना दिला आहे. या कथेतील अंजनी ही नेहमी नळ बंद न करता तसाच चालू ठेवते. ही बाब तिची आई, ताई आणि आजी यांना खटकते. ते तिला बोलून देखील दाखवतात. पाण्याची बचत करावी ते वाया घालू नये अशी त्या तिघीही सांगतात. बाईंनी देखील धडा शिकवताना पाण्याचं महत्त्व त्यांना सांगितले होते. परंतु अंजनीच्या ते गळी उतरले नाही. एक दिवस मात्र शेतात आजीबरोबर फिरताना अंजनीच्या दोन्हीही बाटल्या संपल्या. तिच्या घशाला कोरड पडली. मग तिला पाण्याचे महत्व कसे पटले हे लेखिकेने अतिशय सुंदररित्या पटवून दिले आहे. तसेच बालचमुंना पाणी बचतीचा संदेश यातून दिला आहे.
या कथेत लेखिकेने कुरकुरे, चायनीज आणि चॉकलेट खाणाऱ्या मुलाचे वर्णन केले आहे. घरातील सर्व जण त्याला बाहेरचे खाऊ नको म्हणून सांगतात. परंतु तो कुणाचेही ऐकत नाही. आई बाबा शेवटी थकून जातात. शेवटी एक दिवस त्याचे पोट दुखायला लागते आणि मग त्याला डॉक्टरांकडे दवाखान्यात घेऊन जातात. मग पुढे काय होते. चिनूचे बाहेरचे पदार्थ खाण्याची कसे सुटते हे या कथेत लेखिकेने मांडत छोट्या बाल दोस्ताना वास्तवतेचे दर्शन घडवले आहे.






Users Today : 4
Users Yesterday : 7