शिक्रापूर:प्रतिनिधी:विनायक साबळे
शिक्रापूर पोलीस ठाण्याने शिक्रापूर, कोरेगाव भीमा आणि तळेगाव ढमढेरे येथील आठवडा बाजारांमध्ये वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेला उल्लेखनीय यश मिळाले आहे. गेल्या दीड महिन्यात सात चोरट्यांना रंगेहात पकडून त्यांच्याविरुद्ध तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत मोलाची मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांनी विशेष सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

आठवडा बाजारातील गर्दीचा फायदा घेत मोबाईल, दागिने व रोकड चोरीच्या घटना वाढत असल्याने शिक्रापूर पोलिसांनी विशेष पथके तैनात करून सातत्याने गस्त सुरू केली होती. यासोबतच ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत होते. पोलिसांच्या या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने चोरीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यात यश आले.

या मोहिमेदरम्यान शिक्रापूर आठवडा बाजारात सारिका राजू जाधव व साक्षी मेघराज पवार (रा. मांतरवाडी, हडपसर) या दोघींना चोरी करताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कोरेगाव भीमा आठवडा बाजारात जावेद अजिज सय्यद व लुकमान सुलेमान सय्यद (रा. शिरूर) यांनाही नागरिकांच्या माहितीच्या आधारे ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

दरम्यान, गुरुवारी पुन्हा कोरेगाव भीमा आठवडा बाजारात गस्त सुरू असताना मालन सहदेव पवार, रेखा गणेश दगडे आणि सायली कार्तिक दगडे (सर्व रा. वाघोली, ता. हवेली) या तीन महिलांना चोरी करताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

या सर्व कारवायांमध्ये स्थानिक नागरिकांनी संशयितांवर लक्ष ठेवणे, तातडीने पोलिसांना माहिती देणे आणि कारवाईदरम्यान सहकार्य करणे अशी महत्त्वाची भूमिका बजावली. या योगदानाची दखल घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सुरेश भांडवलकर, दिनेश भोरे, साईनाथ शिनगारे (सर्व रा. कोरेगाव भीमा), सिकंदर शेख, रियाज शेख (दोघे रा. शिक्रापूर) तसेच इतर मदतगार नागरिकांचा शिक्रापूर पोलीस ठाण्यात पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक, गोपनीय अंमलदार संदीप कारंडे तसेच पोलीस कर्मचारी श्रावण गुपचे, सुरेंद्र सरोदे आणि अजिंक्य कुदळे उपस्थित होते.
शिक्रापूर पोलिसांनी नागरिकांना आठवडा बाजारासह गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहण्याचे आवाहन करत, संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.






Users Today : 18
Users Yesterday : 127