शिरूर प्रतिनिधी.
नाशिक येथील वैशाली सूर्यवंशी सोनवणे या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. किशोर, कुल्फी, चिकूपिकू आणि ऋग्वेद यांसारख्या दर्जेदार मासिकांमधून त्यांचे सतत लेखन असते. सकाळ ॲग्रोवन वृत्तपत्रात मशागत या सदरासाठी त्यांनी स्तंभलेखन केले आहे. त्यांचा समिधा हा काव्यसंग्रह तर डॅनीच्या मिशा आणि इतर गोष्टी हा बालकथा संग्रह प्रकाशित आहे.
वैशाली सोनवणे या छोट्या बाल दोस्तांसाठी जांभळीचा बंगला हा बालकथासंग्रह घेऊन आले आहेत.या कथासंग्रहात एकूण आठ कथा आहेत. सर्वच कथा वाचणीय असून विद्यार्थ्यांच्या वयोगटाला अनुरूप अशाच आहेत.
हरण्या या कथेत दुष्काळाचे वर्णन करत लेखिकेने कार्तिक आणि वासराच्या निरागस नात्याचे वर्णन येथे केले आहे. या कथेत दुष्काळामुळे गुरांना चारा पाणी उपलब्ध नव्हता. त्यामुळे मालकाचा जीव तुटत होता. शेवटी न राहून त्यांनी गुरांना विकण्याचा निर्णय घेतला. त्यात कार्तिक नावाच्या शाळकरी मुलाचा हरण्या या वासरावर खूप जीव होता. त्याला तो विकू द्यायचा नव्हता. आपण शाळेत गेल्यावर ते त्याला विकतील म्हणून तो शाळेतही गेला नव्हता. त्याच्यासाठी त्याने जेवणही सोडले होते. ते पाहून आक्काचाही जीव कासावीस होत होता. कार्तिकच्या मित्रांचाही या गोंडस वासरावर खूप जीव होता. तांबूस करड्या रंगाचा, पाणेदार डोळ्यांचा आणि ऐटीत चालणारा हरण्या सर्वांना खूप आवडायचा. त्यांनाही तो विकू नये असेच वाटायचे. कार्तिककडे पाहून शेवटी अण्णाने आणि अक्काने एक आठवडाभर थांबण्याचा निर्णय घेतला. परंतु आठवडाभर गुरांना चारा पाणी देता करता त्यांचा जीव मेटाकुटीला आला होता. शेवटी आठवडा कसाबसा गेला. गुरांना बाजारात न्यायचा दिवस उगवला.
शाळेत बाईनी एक पत्राचा उपक्रम घेतला होता. तेव्हा कार्तिकने आपलं पत्र मामाला लिहून तुफान्या, वादळया आणि हरण्या यांना दुष्काळ मिटेपर्यंत काही दिवस घेऊन जाण्याची विनंती केली. मामानेही त्याची विनंती मान्य करत तो तडक मोटार सायकल वरून त्याला भेटण्यासाठी आला. त्याला पाहताच कार्तिकचा आनंद गगनात मावत नव्हता.
कार्तिकचा मामा सुदामा याने आक्का व अण्णांना समजावून सांगत गुरांना आपल्या गावी नेले. कितीतरी दिवस न बोलणारी बहीण भावांची मन कार्तिकच्या एका पत्राने जुळली. शिवाय गोठ्यातली गुरे कायमची त्यांच्यासोबत राहिली. हरण्या नावाच्या कथेतून लेखिकेने मुक्या गुरांविषयी असणारे निरागस प्रेम आपल्या कथेतून दाखवले आहे.
तर जांभळीचा बंगला ही भयकथा लेखिकेने अतिशय सुंदर रित्या वर्णन केली आहे. यात भिवा, बारक्या आणि शंकरा या तीन मित्रांनी केलेल्या साहसाचे धाडसाचे आणि पराक्रमाचे वर्णन लेखिकेने अतिशय सुंदर शब्दात केले आहे. जांभळीच्या बंगल्यावर जाऊन आपण कैऱ्या खाऊ असे भिवानी दोघांना सांगितल्यावर तिघेही तिथे गेले. जांभळीच्या बंगल्यावर भुते असतात असे इतरत्र सर्वत्र सांगितले असते. मात्र तिघेही न घाबरता त्या ठिकाणी जातात. तिथे मात्र त्यांना वेगळाच प्रकार पाहायला मिळतो. मग ते तिघे काय करतात ते पाहणे खूप उत्सुकतेचे ठरेल. मुलांच्या मनातील भुताविषयी भीती घालवण्यासाठी ही कथा खूपच समर्पक आहे. मनोरंजनातून प्रबोधकाकडे जाण्याचा लेखिकेने जो मार्ग अवलंबला आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे.

लिली शिकता एका दिव्यांग मुलीचे आहे. बारीक डोळ्यांची, बसक्या नाकाची, बुटकी लिली इतर मुलांपेक्षा वेगळी होती. साई हा तिचा मित्र होता. साई तिला नेहमी प्रोत्साहन देत होता. एक दिवस धावण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांनी तिला सांगितलं. स्पर्धेसाठी बसने जावे लागेल या कल्पनेने ती हरकून गेली. बाबाही तिला गुलाबी रंगाची आईस्क्रीम देणार होता. आईने चांगली तयारी करून देऊन तिला पाठवले. धावण्याच्या स्पर्धेसाठी मुले उभे राहिल्यावर शिट्टी वाजल्यावर स्पर्धेला सुरुवात झाली. लिली जोरात धावू लागली. ती सर्वांच्या पुढे होती.

अचानक लिलीच्या बाजूचा मुलगा शुभम हा खाली पडला आणि त्यावेळी ती जागेवर थांबून त्याच्याकडे गेली. त्याच्या पायाला जखम झाली होती. तिने रूमालाने जखम पुसून घेतली आणि आपला निळा रुमाल त्यावर बांधला. त्यावेळी ती शर्यत हरली परंतु वाचकांच्या मनात मात्र ती जिंकली.

पुणे येथील दिलीपराज प्रकाशनने या पुस्तकाची साजेशी बांधणी केली आहे. पुस्तकाची गुणवत्ता आणि पानांचा दर्जा त्यांनी केलेल्या मेहनतीची साक्ष देतो. पुस्तक पाहिल्यावर ते लगेच हातात घ्यावेसे वाटते व त्यातील चित्र चाळल्यानंतर पुस्तकाची उत्सुकता अधिक वाढते. प्रसिद्ध चित्रकार संतुक गोलेगावकर यांनी विषयाला अनुरूप काढलेले आकर्षक मुखपृष्ठ व आतील चित्रे पुस्तकाच्या उंचीत मोलाची भर टाकते. ज्येष्ठ साहित्यिका विजया वाड यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे. वैशाली सूर्यवंशी यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.






Users Today : 6
Users Yesterday : 7