शिरूर प्रतिनिधी:
युवा कवी आकाश भोरडे हा नव्या दमाचा दमदार कवी आहे. झालं बाटुकाचं जिणं हा नवाकोरा काव्यसंग्रह घेऊन त्याने साहित्य क्षेत्रात आपले पहिले पाऊल ठेवले आहे. निमगाव म्हाळुंगी या दुष्काळी गावात राहत असताना आपले जगणे त्यांनी कवितेतून मांडले आहे. समाजात वावरत असताना जे पाहिले, जे अनुभवले तेच त्यांनी लिहिले आहे. त्यामुळे कल्पनेपेक्षा वास्तवात जगणे कवीने अधिक पसंत केले आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक कविता काळजातून आलेल्या आहे. समाजाचं धगधगतं वास्तव कवीने आपल्या धारदार लेखणीने शब्दबद्ध करून त्याच्या कवी मनाची वाट मोकळी केली आहे. त्यामुळे आकाशची कविता परिवर्तनाची साद घालते. शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करते. त्यांचं प्रतिनिधित्व करते.
या काव्यसंग्रहात एकूण 76 कविता आहेत. सर्वच कविता वाचनीय असून त्या मानवी मूल्यांनी समृद्ध आहेत. त्या वाचकाला लढण्याची प्रेरणा देतात. पाठीच्या आजाराने त्रस्त असून देखील तरीही न थकता आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या आपल्या कष्टकरी बापाला त्याने आपला पहिला कवितासंग्रह अर्पण केला आहे. यावरूनच आकाशच्या कविता किती प्रामाणिक आलेल्या असतील याचा आपल्याला अंदाज येईल. आई माझी थोर या आपल्या पहिल्याच कवितेतून कवीच्या प्रतिभेची क्षमता आपल्याला पहायला मिळते. आई लेकरासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी काय असते ते कवीने आपल्या कवितेतून अतिशय सुंदररित्या मांडली आहे. तो म्हणतो,
आई आवडती सर्वांची
आई सावली विश्वाची
तिच्यासहवासाने वाजे
रोज सनई सुखाची
तसेच आपल्या कुटुंबासाठी दिवस रात्र काबाडकष्ट करणारी आई लेकराकडून चूक झाली तर त्याचे पाऊल वाकडे पडू नये म्हणून ती कधीकधी कठोरही होते. हे सांगताना कवी म्हणतो,
आई समईची वात
जळे स्वतः दिनरात
घडता हातून चूक
वाटे तलवारीचं पातं
अशी आई कितीही कठोर असली तरी आपल्या लेकरासाठी मायेचा सागर असते. आपल्या कुटुंबासाठी मोठा आधार असते. तिच्याशिवाय घराला घरपण नाही हे सांगताना कवी म्हणतो,
आई पावसाची सर
आई वारा थंडगार
जगी सर्वश्रेष्ठ
अशी आई माझी थोर
कवी आकाश भोरडे याने ग्रामीण भागात राहून आई- वडिलांचे कष्ट जवळून पाहिले आहेत. त्यांच्याबरोबर त्याने परिस्थितीचे चटके सोसून बालवयातच काबाडकष्ट केले आहेत. त्यामुळे त्याच्या कवितांना संघर्षाची धार आहे. त्या परिस्थितीपुढे गुडघे न टेकता अन्याय विरुद्ध बंड करतात. समाजामध्ये परिवर्तन आणण्याचे सामर्थ्य ठेवतात. हे करत असताना या कवितांना संस्काराची झालरही दिसून येते. आपले हक्काचे मिळवत असताना कोणावर अन्याय होणार नाही याची तो काळजी घेतो.
माझा बाप शेतकरी या कवितेत बापाच्या कष्टाची तो वर्णन करताना म्हणतो,
माझा बाप शेतकरी
कष्ट करितो मातीत
पंचपकवान नसे पोटी
मिरची भाकर हातात
अशा पहाडासारख्या बापाच्या कवितेचा शेवट करताना तो म्हणतो,
सारे अंबर पांघरून
पाषाण ठेवितो उशाला
जलद असून जवळी
पडते कोरड घशाला
अगदी लहानांनाच नव्हे तर थोरा मोठ्यांनाही आवडतील आणि त्यांचे उद्बोधन करतील अशा या कविता जीवनाचे सार वाचकाला सांगून जातात. वाचक त्यात इतका रमतो की त्या त्याला आपल्या वाटतात.

परिस्थितीचे चटके सोसून देखील समाजाविषयी कोणताही द्वेषभाव न करता समाजाला देण्याची वृत्ती आकाश जपत आहे. तू आपल्या कवितेतून कष्टकऱ्यांचे जगणे मांडत आहे. त्यांचे नेतृत्व करत असताना तो आपले म्हणणे मांडताना कुठेही टोकाची भूमिका न घेता आपल्या धारदार शब्दांच्या मदतीने तो इतरांचे लक्ष अचूकपणे वेधून त्यावर दाद मागत आहे. एक वेळेस नशीब दगा देऊ शकते पण कष्ट दगा देऊ शकत नाही. यावर त्याचा ठाम विश्वास असल्यामुळे तो चांगल्या कर्माला प्राधान्य देतो. त्याचीही सकारात्मक ऊर्जा आणि युवकांना प्रेरणा देऊन जाते.
पुणे येथील माननीय गिरीश भांडवलकर यांच्या नावाजलेल्या परिस प्रकाशनने या पुस्तकाची साजेशी बांधणी केली आहे. पुस्तकाची गुणवत्ता आणि पानांचा दर्जा त्यांनी केलेल्या मेहनतीची साक्ष देतो. प्रसिद्ध चित्रकार माननीय श्री. अरविंद शेलार, यांनी विषयाला अनुरूप काढलेले आकर्षक मुखपृष्ठ व आतील प्रसंगाला अनुरूप साजेशी चित्रे पुस्तकाच्या उंचीत मोलाची भर टाकते. कवी हनुमंत चांदगुडे यांनी या पुस्तकाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिली आहे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे. आकाश भोरडे यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा..!
[सचिन बेंडभर पाटील]







Users Today : 6
Users Yesterday : 7