प्रतिनिधी. संतोष साळुंके.
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील हवेली तालुक्याचे झपाट्याने होणारे नागरीकरण, वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन मुळशी विभागाचे विभाजन करून स्वतंत्र ‘हवेली वीज वितरण विभाग’ निर्माण करण्यात यावा, अशी मागणी शिरूर हवेलीचे कार्यक्षम विद्यमान आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांनी केली आहे.

यासंदर्भात आमदार कटके यांनी महावितरण पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. पंकज तगलपल्लेवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी हवेली तालुक्यासाठी स्वतंत्र वीज वितरण विभाग निर्माण करण्याबाबत सविस्तर चर्चा करून, त्याचा प्रस्ताव तयार करावा आणि पुढील मंजुरीसाठी महावितरणच्या मुख्य कार्यालय, प्रकाशगड (मुंबई) येथे तातडीने पाठवावा, अशी मागणी त्यांनी मुख्य अभियंत्यांकडे केली.

यासोबतच लोणी काळभोर येथील EHV उपकेंद्राचे काम पूर्ण करणे, वाघोली परिसरातील प्रस्तावित दोन EHV उपकेंद्रांची उभारणी, शिंदवणे सबस्टेशन कार्यान्वित करणे, पेरणे सबस्टेशनचे काम पूर्ण करणे, तसेच नवीन कोरेगाव (कोरेगाव मूळ) आणि उरुळी कांचन येथे नवीन सबस्टेशन व फीडर्स उभारण्याची मागणीही त्यांनी केली.
तसेच शासनाच्या सौर ऊर्जा योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिक आणि गृहनिर्माण संस्थांना मिळावा, प्रलंबित वीज जोडण्या तातडीने मंजूर कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
आमदार माऊली आबा कटके म्हणाले की, “हवेली तालुक्याचा झपाट्याने विस्तार होत असून आगामी काळात लोकसंख्या, औद्योगिक क्षेत्र आणि गृहप्रकल्पांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळेजे केवळ आजच्या विजेच्या गरजांचा विचार करून चालणार नाही, तर पुढील २५ वर्षांचे नियोजन करणे आवश्यक आहे. नागरिकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, तसेच भविष्यात पायाभूत सुविधांचा अभाव निर्माण होऊ नये, यासाठी स्वतंत्र हवेली वीज वितरण विभागाची मागणी केली आहे.”





Users Today : 1
Users Yesterday : 37