प्रवचनकाराची खिल्ली उडविणाऱ्या प्रवृत्तीमुळे समाजप्रबोधनाला बसतोय धक्का

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी :

शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावात आयोजित प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमादरम्यान घडलेल्या एका प्रकारामुळे वारकरी संप्रदायातील संस्कार, परंपरा आणि समाजप्रबोधनाच्या मूल्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या एका महिला प्रवचनकारांनी आपल्या प्रभावी वाणीमधून अध्यात्म, संस्कार, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, कुटुंब व्यवस्था आणि सामाजिक एकोपा यांसारख्या विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रवचनाला श्रोत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मात्र कार्यक्रमाच्या शेवटी श्रद्धांजलीपर भाषण करताना त्याच गावातील स्वतःला ह.भ.प. म्हणून संबोधणाऱ्या एका महाराजांनी अप्रत्यक्षपणे महिला प्रवचनकारांच्या कार्याची खिल्ली उडविल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. त्यांच्या वक्तव्यातून प्रवचन सेवेपेक्षा स्वतःची श्रेष्ठता सिद्ध करण्याचा प्रयत्न दिसून आल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.


वारकरी संप्रदाय हा संतांच्या समतेच्या आणि विनम्रतेच्या विचारांवर उभा आहे. समाजाला योग्य दिशा देणाऱ्या प्रवचनकारांचा सन्मान करणे हीच संत परंपरेची शिकवण असताना सार्वजनिक व्यासपीठावर अशा प्रकारची टीका किंवा उपहास करणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया अनेक भाविकांनी व्यक्त केली. विशेषतः महिला प्रवचनकार समाजातील विविध प्रश्नांवर जनजागृती करून संस्कारमूल्ये रुजविण्याचे कार्य करीत असताना त्यांची अवहेलना करणे ही संत परंपरेला शोभणारी बाब नसल्याचे मत व्यक्त होत आहे.

समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या कीर्तनकार, प्रवचनकार आणि आध्यात्मिक मार्गदर्शक यांच्यामध्ये परस्पर आदर आणि सन्मानाची भावना असणे आवश्यक आहे. मात्र काही व्यक्तींच्या अहंकारी आणि स्पर्धात्मक वृत्तीमुळे चांगले कार्य करणाऱ्या प्रवचनकारांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून अशा प्रवृत्तीमुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याची खंत उपस्थितांनी व्यक्त केली.

संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या विचारांमध्ये परस्पर सन्मान, नम्रता आणि समाजहिताला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे वैयक्तिक प्रसिद्धीपेक्षा समाजप्रबोधनाला महत्त्व देणे ही काळाची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 5 6 7 8
Users Today : 79
Users Yesterday : 26