शिक्रापूर.प्रतिनिधी(विनायक साबळे): शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पिंपळे जगताप उपबाजारातील सेस व बाजार शुल्क वसुलीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत उपबाजारातील कर्मचारी, अधिकारी, आडतदार व दलाल यांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत निळ वादळ संघटनेच्या दिपीका भालेराव यांनी बाजार समितीकडे निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, पिंपळे जगताप उपबाजारात व्यापारी व आडतदारांकडून वसूल करण्यात येणाऱ्या सेस व बाजार शुल्काच्या वसुलीत काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी संगनमत करून प्रत्यक्ष वसुलीपेक्षा कमी रक्कम नोंदविल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे बाजार समितीचे आर्थिक नुकसान झाले असून संबंधित व्यवहारांमधून काही रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी वळविण्यात आल्याची शक्यता असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यासाठी १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीतील सर्व सेस व बाजार शुल्क वसुलीची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच व्यापारी, आडतदार, दलाल व बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांमधील आर्थिक व्यवहारांची पडताळणी, संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बँक खात्यांची चौकशी, महसुली व संगणकीय नोंदींचे परीक्षण तसेच पावत्या व बँक जमा रकमेची ताळमेळ तपासणी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या प्रकरणासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. अन्यथा बाजार समिती कार्यालयासमोर सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निळ वादळ संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
दरम्यान, पिंपळे जगताप उपबाजारातील आर्थिक व्यवहारांमध्ये कथित अफरातफर झाल्याची चर्चा परिसरात रंगू लागली असून, ऐन बाजार समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण समोर आल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. या आरोपांमुळे आगामी काळात बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बाजार समितीच्या निवडणुकांचे वातावरण तापत असतानाच आर्थिक अनियमिततेच्या आरोपांनी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसत आहेत. चौकशीची मागणी आणि आंदोलनाचा इशारा यामुळे येत्या काही दिवसांत हे प्रकरण अधिक चर्चेत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.





Users Today : 7
Users Yesterday : 289