शिरूर प्रतिनिधी:
शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली असून, उपनगराध्यक्ष मितेश प्रदीप गादिया यांच्याविरोधात मांडण्यात आलेला अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला आहे. शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्या अध्यक्षतेखाली रसिकभाऊ धारीवाल सभागृहात झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

ठरावाच्या बाजूने २० मते पडल्याने मितेश गादिया यांना उपनगराध्यक्ष पदावरून हटविण्याची घोषणा नगराध्यक्षांनी केली.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम ५५-१अ अन्वये ही विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. नगरपरिषदेतील १८ नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांचे कामकाज असमाधानकारक असल्याचे नमूद करीत त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यासाठी विशेष सभा बोलावण्याची मागणी केली होती. यासंदर्भातील सूचना नोटीस दि. २६ ऑक्टोबर रोजी नगराध्यक्षांना देण्यात आली होती.

त्यानुसार आज सकाळी ११ वाजता विशेष सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू झाले. सभेच्या सुरुवातीला एकूण २८ सदस्यांपैकी २७ सदस्य उपस्थित होते. मात्र, उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सहा नगरसेवकांनी सभात्याग केला.
यामध्ये मितेश प्रदीप गादिया, स्वप्नाली योगेश जामदार, सुनीता संतोष पोटे, चारुशिला गणेश कोळपकर, रवी ऊर्फ शाम मनोहर ढोबळे आणि अमोल दादासाहेब चव्हाण यांचा समावेश होता.

दरम्यान, सभेमध्ये उपनगराध्यक्षांना पदावरून हटविण्याच्या बाजूने २० मते पडली. त्यामुळे अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाल्याचे जाहीर करत नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांनी मितेश गादिया यांना उपनगराध्यक्ष पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घोषित केला.
या निर्णयामुळे शिरूर नगरपरिषदेतील सत्तेच्या राजकारणाला नवे वळण मिळाले असून, आगामी काळात नगरपरिषदेतील राजकीय समीकरणे कशी बदलणार, याकडे शिरूरकरांचे लक्ष लागले आहे.
शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी उलथापालथ!





Users Today : 100
Users Yesterday : 526