शिरूर प्रतिनिधी : सुदर्शन दरेकर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिरूर आगारातील सहा अनुभवी, कर्तव्यनिष्ठ आणि सेवाभावी कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला. रविवार (दि. ३१ मे २०२६) रोजी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सहकारी कर्मचारी, अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.

सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये चालक राजू मामा काळे, नामदेव मामा फलके, वाहतूक नियंत्रक दिलीप खोडाळ, बाळासाहेब उमाप, डेपो नियोजन विभागातील गायकवाड साहेब तसेच वाहक भास्कर मामा पवार यांचा समावेश होता.
चालक राजू मामा काळे यांनी आपल्या निर्भीड, स्पष्टवक्ते आणि अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका घेणाऱ्या नेतृत्वामुळे कामगारांमध्ये विशेष स्थान निर्माण केले. स्वतःच्या हक्कांसोबतच सहकाऱ्यांच्या न्यायासाठी सातत्याने आवाज उठवून त्यांनी आदर्श नेतृत्वाची ओळख जपली.
नामदेव मामा फलके यांनी शांत, संयमी व मनमिळावू स्वभावामुळे सर्वांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यांचा साधेपणा आणि प्रेमळ संवादशैली कायम स्मरणात राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
वाहतूक नियंत्रक दिलीप खोडाळ आणि बाळासाहेब उमाप यांनी वाहतूक नियंत्रण विभागात अत्यंत जबाबदारीने काम करत अनेक वेळा रात्रपाळी सांभाळून आगाराची सेवा अखंड सुरू ठेवली. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे अनेक गुंतागुंतीच्या समस्या सहजपणे मार्गी लागल्या.
डेपो नियोजन विभागातील गायकवाड साहेब हे अचूक नियोजन, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि शांत स्वभावासाठी ओळखले जात होते. ड्युटी नियोजनातील त्यांची काटेकोरता आणि पुढील दिवसाचे कामकाज सुरळीत राहावे यासाठी केलेले नियोजन विशेष उल्लेखनीय ठरले.
वाहक भास्कर मामा पवार यांची ओळख “शिरूर-संभाजीनगर एक्सप्रेस” अशीच बनली होती. प्रवाशांना विश्वासार्ह सेवा देणे, चालकांची वेळेआधी व्यवस्था करणे तसेच आगाराला अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे प्रवासी आणि सहकाऱ्यांच्या मनात त्यांनी कायमचे स्थान निर्माण केले.

या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठ सेवेतून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि शिरूर आगाराचा नावलौकिक वाढविला. त्यांच्या अनुभवातून, मार्गदर्शनातून आणि कार्यपद्धतीतून अनेक कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळाली आहे.
या सेवापूर्ती सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अहिल्यानगर दक्षिण निलेश लंके उपस्थित होते. तसेच रामलिंगचे प्रथम आदर्श सरपंच विठ्ठल शेठ घावटे यांच्यासह शिरूर आगारातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि आनंदाच्या शुभेच्छा दिल्या.
“कर्तव्य, शिस्त, प्रामाणिकपणा आणि समर्पणाचा आदर्श ठरलेल्या या सहा शिलेदारांचे योगदान शिरूर आगाराच्या इतिहासात कायम स्मरणात राहील,” अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.






Users Today : 114
Users Yesterday : 26