अंतरवाली सराटी (प्रतिनिधी):सुदर्शन दरेकर
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे भर उन्हात उपोषणाला बसलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण स्थगित केले आहे. राज्य सरकारशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी मध्यस्थी करत जरांगे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

या चर्चेनंतर सरकारने मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगितले जात असून त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. यावेळी राज्य सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे आभारही व्यक्त करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी अनेकदा आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे यावेळी सरकारने दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते, याकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे. आरक्षणासह इतर प्रलंबित मागण्यांबाबत सरकार कोणती ठोस पावले उचलते, यावर आगामी काळातील मराठा समाजाची भूमिका निश्चित होणार आहे.
उपोषण स्थगित झाल्याने तात्पुरता तणाव कमी झाला असला तरी मराठा समाजाच्या अपेक्षा आणि मागण्या पूर्ण करण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर कायम आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सरकारच्या निर्णयांकडे राज्यभरातील मराठा बांधवांचे बारकाईने लक्ष राहणार आहे.





Users Today : 361
Users Yesterday : 58