शेतकऱ्यांच्या संवेदना मांडणारा कवितासंग्रह- येते जगाया उभारी

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
पाठ्यपुस्तकातील कवी, साहित्य क्षेत्रामध्ये युवा साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेले नाव म्हणजे सचिन बेंडभर,
यांनी शेतकऱ्यांच्या खऱ्या भावना मांडणारे साहित्य आणि शेतकऱ्यांच्या मनात सतत भेडसावणाऱ्या समस्या, अडचणी अधोरेखित केल्या तो कवितासंग्रह म्हणजे “येते जगाया उभारी” हा होय. तरुण लेखक, कवी, साहित्यिक सचिन बेंडभर यांनी त्यांच्या एका वेगळ्या शैलीत लिहिलेला हा कविता संग्रह आहे. त्यांचे साहित्य क्षेत्रात आज पर्यंत 30 ते 35 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. अशी गगन भरारी घेणारे कवी, बाल साहित्यिक सचिन बेंडभरे सर यांचा येते जगाया उभारी या कवितासंग्रहाविषयी आज आपण पाहणार आहोत.
कवी सचिन बेंडभर यांच्या कविता अनेक दैनिकात, मासिकात, दिवाळी अंकात प्रकाशित झालेले आहेत.येते जगाया उभारी या कवितासंग्रहात पहिल्याच कवितेत म्हणतात…
गात गाणे फिरे पाणी पाटातून खळखळ तृष्णा भागवी पिकांची छाया धरिते आभाळ

शेतकरी जेव्हा शेतात पिकांना पाणी देत असतो, तेव्हा पाणी पाटातून वाहत असताना कवीला ते गाणे म्हणते असे वाटते व पिकांची तहान भागवीते, उन्हाचा तीव्र कडाका असताना देखील आभाळ सावली देण्याचे काम करते. अशा भावना कवी व्यक्त करतात.
तसेच निसर्ग मानवाला कळला पाहिजे त्यासाठी निसर्गाचे नियम पाळले पाहिजेत पण ते आपण न पाळता, दुसऱ्याने पाळावेत असे प्रत्येकाला वाटते असा संदेश देणारी कविता ‘कळावा निसर्ग मानवा’ या कवितेचे मांडायला विसरत नाहीत.
कामासाठीच त्याची नेमणूक त्यासाठीच त्याला पगार
तर ही लाच मागितली तर खुशाल त्याला हात उगार
अशा तीव्र भावना व्यक्त करणारी कविता कवी बेंडभर ‘खुशाल त्याला हात उगार’ ही लिहितात.
मराठी भाषेतले अनेक शब्द नष्ट होताना दिसतात. काही शब्द तर आजच्या नव्या पिढीला कळत देखील नाहीत असे शब्द घेऊन कवी सचिन बेंडभर आपल्या ‘खळं’ या कवितेत म्हणतात..
बैल पाथला झुंपली
गोल फिरती खळ्यात
नवी राशीत खेळती
खुरा घसरे दाव्यात
पूर्वी धान्याची मळणी करण्यासाठी एका विशिष्ट गोल आकाराचं खळ तयार करून त्यात ज्वारीची कणस किंवा जे पीक मळायचं आहे त्यात टाकून त्याच्यावरून बैल फिरवून त्याची मळणी केली जायची. अशी शेतकऱ्यांची काम करण्याची पद्धत त्यांनी या कवितेमध्ये मांडलेले आहे.

काढणी करताना भल्लरी गीत गायले जात असे आणि त्याच भल्लारी गीताची कविता कवी सचिन बेंडभर येते जगाया उभारी या कवितासंग्रहात घेतात आणि शेतकरी आनंदात काढणी खुडणी करताना हे गीत म्हणत असतात हे आवर्जून लेखक लिहितात.

‘निखारा’ या कवितेत दुःख गोंजारीत बसायचं नाही, जळक्या हातात घेऊन दगड, ठेचून काढायचे पांढरे साप, न भिता, न घाबरता, जीवन जगायचं आहे, मरणाला घाबरायचं नाही, पेटती मशाल हाती घेऊन, भ्रष्ट व्यवस्थेवर प्रहार करणारी ही कविता कवी लिहितात.
तसेच ‘सावध हो गाफील नको’ या कवितेत म्हणतात.
माती नुसती माती नाय,
शेतकऱ्याची असते माय
भुकेलेल्या श्रमिकाचा घास,
दुसर कोण देतं काय
माणसाला जीवन जगायला आधार देणारे मातीशिवाय दुसरं कोणीच नाही, तीच खरे आपली माय आहे, कुणब्याच्या अडचणी सोडवण्यासाठी काळी मातीच मदतीला येते, असे कवी या कवितेत म्हणतात..
‘जगबुडी’ सारख्या कवितेत शेतकऱ्याचे होणारे नुकसान, वाहून जाणारा संसार, त्यांच्या वाटेला येणार दुःख कवी मांडतात.
शेतकरी नेहमी आशेवर जगत असतो, आज ना उद्या आपला काळ उजडेल, आपण सुखी होऊ, असं प्रत्येक कष्टकरी शेतकऱ्याला वाटत असतं. शेतकऱ्याचे जीवन सगळं पावसावर अवलंबून असतं, या सर्व गोष्टीचा विचार करून ‘दिस चांगले येणार? या कवितेत कवी म्हणतात..

आलं झाकाळून नभ, ढग वाऱ्या संग खेळ
अभिषेक भूमीवरी, आता करील आभाळ
आता चांगला पाऊस येईल आणि पीक चांगलं उभारी धरेल आणि धन धान्य भरपूर येईल, पाऊस भरपूर पडेल, नदीला पाणी येईल परंतु कवी पुढे म्हणतो की, पाणी जपून वापरले पाहिजे, नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, म्हणजे ड्रीप किंवा ठिबक सिंचन यांचा वापर करून थेंब थेंब जपून वापरला पाहिजे, पावसाचा थेंब ना थेंब अडवला पाहिजे, जिरवला पाहिजे असा महत्त्वाचा आणि आजच्या समाजाला आवश्यक असणारा संदेशही कवी कवितेत देतात.

संस्कृतीचा कणा, असं घडावं एकदा, धरतीच्या कुशीत, बाप अशा कसदार 88 प्रेरणादायी कविता या येते जगाया उभारी या कवितासंग्रहात आपल्याला वाचायला मिळतात. सुंदर असं या पुस्तकाचं बोलक मुखपृष्ठ आहे, या पुस्तकाची बांधणी सुंदर व मजबूत पद्धतीने करून प्रकाशन यशोदीप पब्लिकेशन पुणे यांनी केलेले आहे. हा कवितासंग्रह सर्वांनी आवर्जून वाचावा असा सुंदर असा कवितासंग्रह आहे. प्रत्येकाच्या घरात असायला हवा, लहान पोरांना नक्कीच आवडेल, अशी अपेक्षा आहे. पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा…

[पुस्तक परिचय- आश्रुबा अंकुश कोठावळे, संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय कळंब ता. कळंब जि. धाराशिव.]

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 7 1 3 9 6
Users Today : 2
Users Yesterday : 51