[सचिन बेंडभर यांच्या बालकाव्यसंग्रहास सातवा राज्यस्तरीय पुरस्कार ]
पुणे दि. 26 (प्रतिनिधी)-
मंचर येथील कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानकडून दरवर्षी मराठी साहित्यातील बालसाहित्य या विभागात बालसाहित्यिकांना पुरस्कार दिले जातात. या वर्षी बालसाहित्य विभागात पिंपळे जगताप ता.शिरूर येथील सचिन बेंडभर यांच्या दिलीपराज प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या मामाच्या मळ्यात या बालकाव्यसंग्रहाला कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह ,प्रशस्तिपत्र, शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

उपस्थीत मान्यवर:
यावेळी कार्यक्रमाला प्रसिद्ध साहित्यिक प्रा. साईनाथ पाचारणे, नागेश हुलावळे, बबनराव पाटील, वैभव टेमकर, ललिता सबनीस, युवा कवी आकाश भोरडे, प्रविण डुंबरे उपस्थित होते.
आभार व सूत्रसंचालन:
स्नेहल भोर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर दत्ताजी पायमोडे यांनी आभार मानले.
सचिन बेंडभर यांच्या काव्यसंग्रहास 2023 सालचा हा सातवा सन्मान असून याआधी चंद्रपूर येथील कवितेचे घर यांच्या वतीने बापूरावजी पेटकर बालकाव्य पुरस्कार, ऍक्टिव्ह टीचर सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार, साहित्य सेवा प्रज्ञा मंच यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङमय पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा संभाजी सलगर पुरस्कृत ज्ञानोबा सलगर स्मृती पुरस्कार, सारांश मासिकाकडून उत्कृष्ट काव्य निर्मिती पुरस्कार आणि केवळबाई मिरेवाड उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार असे प्रतिष्ठेचे मानले जाणारे पुरस्कार या बालकाव्यसंग्रहास मिळाले आहेत. या काव्यसंग्रहासाठी 2023 सालचा हा मानाचा सातवा सन्मान असून या काव्यसंग्रहास निवड समितीने प्रथम क्रमांक जाहीर केला आहे.
लाहन मुलांसाठी मनोरंजन:
मामाच्या मळ्यात या काव्यसंग्रहात लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक कविता असून त्यांच्या ज्ञानात भर पडेल अशा प्रेरक कवितांचा समावेश आहे. लहान बाल चमुंसाठी संस्काराची शिदोरी म्हणजे सचिन बेंडभर पाटील यांचा मामाच्या मळ्यात हा काव्यसंग्रह!
दिलिपराज प्रकाशनने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला असून प्रसिद्ध चित्रकार सागर नेने यांनी विषयाला अनुरूप चित्रे व आकर्षक मुखपृष्ठ रेखाटले आहे. प्रसिद्ध बालसाहित्यिक सुरेश सावंत यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे.
सचिन बेंडभर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







Users Today : 4
Users Yesterday : 7