पुणे प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील नारोडी येथील महाराष्ट्र आरोग्य मंडळ पुणे संचलित मुक्तांगण आदिवासी मुलींच्या वस्तीगृहात महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांनी भेट दिली ,असता तेथील कामकाज पाहून सागर हगवणे व अश्विनी हगवणे या दांपत्याचे कौतुक करत मुक्तांगण आदिवासी वस्तीगृहाचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील नारोडी येथील मुक्तांगण आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाला नुकतीच भेट दिली .तेथील व्यवस्था पाहणाऱ्या अश्विनी हगवणे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी तेथील सारिका केंगले, ज्योती शेळकंदे, स्वाती वडेकर या मुलींनी त्यांना सर्व वस्तीगृह फिरून दाखवत मुलींच्या राहण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची सोय व तेथील होणारे उपक्रम या सर्वांची माहिती दिली. एकूण साठ विद्यार्थिनींच्या राहण्याची व्यवस्थित व्यवस्था करणाऱ्या अश्विनी हगवणे यांचे व त्यांच्या कार्यात त्यांची मोलाची साथ देणाऱ्या सागर हगवणे यांचे त्यांनी यावेळी कौतुक करत मुक्तांगण आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले.
त्यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत असताना सचिन बेंडभर यांनी त्यांच्या आग्रहास्तव रानातली अंगाई व आजोळ या त्यांच्या कविता गाऊन दाखवीत आपल्या कवितेचा प्रवास उघडला. जीवन जगण्यासाठी कला ही महत्त्वाची असून कलेशिवाय माणूस जगू शकत नाही, असे म्हणत त्यांनी छंद जोपासण्याचा सल्ला यावेळी उपस्थित विद्यार्थिनींना दिला.
