पुणे, दि. 28 (प्रतिनिधी) :
बालमन हे कल्पनांचे मुक्त आकाश असते. या आकाशाला साहित्याची जोड मिळाली, तर त्यातून उद्याचे संवेदनशील कवी, लेखक आणि सर्जनशील व्यक्तिमत्त्वे घडू शकतात, अशा शब्दांत प्रसिद्ध बालसाहित्यिक सचिन बेंडभर यांनी दुसऱ्या बालकुमार साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांशी साहित्यपूर्ण संवाद साधला. आपल्या अनुभवांची शिदोरी, कवितेतील भावविश्व आणि बालसाहित्याविषयीची आत्मीयता यांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना साहित्यनिर्मितीची प्रेरणा दिली.

पुणे जिल्हा परिषद आणि अमरेन्द्र भास्कर बालकुमार मराठी साहित्य संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या बालकुमार साहित्य संमेलनात ‘लेखक आपल्या भेटीला’ हा विशेष कार्यक्रम रंगला. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी दहा वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमात सचिन बेंडभर यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बेंडभर यांनी विद्यार्थ्यांना साहित्याकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. बालसाहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून बालमनाच्या भावविश्वाला आकार देणारे, विचारांना दिशा देणारे आणि कल्पनाशक्तीला बळ देणारे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांनी स्वतःची ‘आजोळ’ ही कविता सादर करताच विद्यार्थ्यांसमोर आठवणींचे, नात्यांचे आणि बालपणातील निरागस आनंदाचे भावविश्व उलगडले.

त्यांच्या काव्यसादरीकरणाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
या कार्यक्रमाचे बहरदार सूत्रसंचालन अनिल गुंजाळ यांनी केले. व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिका नीलिमा गुंडी यांच्यासह शिवाजी चाळक, आश्लेषा महाजन, उत्तम सदाकाळ, संजय ऐलवाड आणि रामदास केदार आदी पाठ्यपुस्तकांतील नामवंत साहित्यिक उपस्थित होते.
पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रास्ताविकातून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष तथा शिक्षण व क्रीडा समिती सभापती विवेक वळसे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, प्रकल्प संचालक संतोष हराळे, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी ललिता दहितुले आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन पुनम कडलग, लीना भागवत, वंदना शिंदे, मुकुंद देंडगे आणि अमोल जंगले यांनी केले.
[‘बालमनातील कल्पनांना साहित्याचे पंख द्या!’
विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्तीचे पंख लावून साहित्याच्या प्रांतात भरारी घ्यावी. आपल्या सभोवतालच्या जगाचे सूक्ष्म निरीक्षण करावे. वाचन, चिंतन आणि लेखन यांची आवड जोपासावी. कथा, कविता आणि कादंबरी यांसारख्या साहित्यप्रकारांमध्ये आतापासूनच डोकावले, तर उद्याचे संवेदनशील कवी आणि प्रतिभावंत लेखक निश्चितच घडतील.]





Users Today : 38
Users Yesterday : 80