प्रतिनिधी. संतोष साळुंके
पुणे : शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील वाघोली परिसरात उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पांच्या जाहिरातींमध्ये ‘खराडी एनएक्स’ आणि ‘अप्पर खराडी’ अशा नावांचा वापर करून सर्वसामान्य घर खरेदीदारांची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर मुद्दा आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांनी उपस्थित केला आहे. अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणाऱ्या विकासकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

वाघोली परिसरात सध्या अनेक मोठे गृहप्रकल्प सुरू असून, संबंधित विकासकांकडून सोशल मीडिया, होर्डिंग्ज तसेच विविध डिजिटल माध्यमांवर जाहिरात करताना मूळ ठिकाणाचा उल्लेख टाळून ‘खराडी एनएक्स’ किंवा ‘अप्पर खराडी’ अशा नावांचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्यक्षात संबंधित प्रकल्पांचे ठिकाण वाघोली परिसरात असताना ग्राहकांसमोर वेगळे भौगोलिक चित्र उभे केले जात आहे. त्यामुळे घर खरेदी करू इच्छिणाऱ्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, त्यांच्या आर्थिक गुंतवणुकीशी हा गंभीर प्रकार निगडित आहे.

घर खरेदी करताना नागरिक कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करतात. त्यामुळे संबंधित प्रकल्पाचे नेमके ठिकाण, पत्ता आणि प्रशासकीय हद्द यांची अचूक व पारदर्शक माहिती देणे ही विकासकांची जबाबदारी आहे. केवळ व्यावसायिक फायदा मिळवण्यासाठी आकर्षक नावांचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल करणे योग्य नाही. संबंधित प्रकल्पांचे पिनकोड, महसूल नोंदी आणि प्रशासकीय तपशील वाघोलीशी संबंधित असताना जाहिरातींमध्ये वेगळ्या नावांचा वापर होणे ही ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचे आमदार कटके यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर वाघोली परिसरातील संबंधित सर्व गृहप्रकल्पांच्या विकासकांना जाहिराती, होर्डिंग्ज आणि प्रकल्पाशी संबंधित कागदपत्रांमध्ये अचूक व अधिकृत ठिकाणाचा उल्लेख करण्याचे स्पष्ट आदेश द्यावेत. तसेच, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या विकासकांची तपासणी करून संबंधित नियमांनुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार कटके यांनी केली आहे.

घर खरेदीदारांची फसवणूक रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकरणात केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल आपल्या कार्यालयास सादर करावा, अशी अपेक्षाही शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार माऊली आबा कटके यांनी व्यक्त केली आहे.





Users Today : 227
Users Yesterday : 278