शिक्रापूर:प्रतिनिधी:विनायक साबळे
आषाढी वारीदरम्यान सोशल मीडियावर लाखो नागरिकांच्या मनाला भिडलेली ज्येष्ठ वारकरी केरू हरीभाऊ खोरे यांची संघर्षमय कहाणी अखेर प्रशासनापर्यंत पोहोचली. मुलाचा मृत्यू, जमिनीचा दीर्घकाळ सुरू असलेला वाद, आर्थिक अडचणी आणि मूलभूत सुविधांचा अभाव अशा अनेक संकटांचा सामना करतही विठ्ठलावरील अढळ श्रद्धा कायम ठेवणाऱ्या केरूबांच्या भेटीस शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

वारीत भेटलेल्या केरू खोरे यांच्या जीवनप्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यांच्या संघर्षाची दखल घेत तहसीलदार मस्के यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

भेटीदरम्यान केरू खोरे यांच्या घरात अद्याप वीज जोडणी नसल्याची बाब समोर आली. याची तातडीने दखल घेत महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर वीज जोडणी देण्यात येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.

तहसीलदार मस्के यांनी केरू खोरे यांच्या जमिनीच्या वादासह इतर प्रशासकीय अडचणींचीही माहिती घेत संबंधित विभागांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पंढरीच्या वारीत विठ्ठलनामाचा गजर करत चालणाऱ्या एका ज्येष्ठ वारकऱ्याच्या वेदनादायी जीवनकहाणीला सोशल मीडियामुळे व्यापक व्यासपीठ मिळाले आणि त्यातून प्रशासनानेही संवेदनशीलतेने पुढाकार घेतल्याने केरू खोरे यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. श्रद्धा, संघर्ष आणि संवेदनशील प्रशासनाचा हा संगम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.






Users Today : 9
Users Yesterday : 191