शिरूर प्रतिनिधी:
पुणे जिल्हयातील शिरुर तालुक्यातील प्रसिद्धी बालसाहित्यिक, राज्यशासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सचिन बेंडभर यांचा विविध पुरस्काराने सन्मानीत केलेला हत्तीची सहल हा बालकाव्य संग्रह वाचकांच्या हाती प्राप्त झाला आहे. या बालकविता संग्रहातून बालमन व पशूपक्षी यांच्यातील भावविश्वाचा ठाव घेतला आहे.
हत्तीची सहल या बालकाव्यसंग्रहात एकूण ४९ कविता असून त्यातून बालचमूसाठी मनोरंजनात्मक ठेवा दिला आहे. सर्वच कविता मुलांना वाचनीय असून त्यांना आकर्षित करणाऱ्या आहेत या कवितेतून पक्षी, प्राणी व निसर्ग यांचा संवाद साधला आहे.

प्रथम कविता ‘हत्तीची सहल ‘ या कवितेवरून बालकाव्यसंग्रहाचे शीर्षक देण्यात आले आहे.
अगडबंब हत्तीने काढली सहल
त्याच्यासोबत माकड,अन् चतुर अस्वल
जाऊन पाहू म्हटले, माणसांचे शहर
कुठं राहतात माणसं,पाहू त्यांचे घर
कवितेतून काढलेली सहल आणि केलेली धमाल या वर्णनातून पुढे कशी गंमत होते हे कवितेत वर्णन लिहिले आहे.
आजी या कवितेतून आजी आणि नातवाचे ऋणानुबंध साकारले आहे.
शाळेतून आलेला चिमणा नातू
त्याला बघताच हसू फुटते
आनंदाने मग घरात आल्यावर
कौतुकाने त्याचा पापा घेते
आजी नातवाचा पिढ्यान पिढ्यांचा गोडवा या कवितेतून अचूक साधला आहे.
पाखरांची गाणी, भित्रा ससा, झाडे वाचवा,चैत्र पालवी, बोलका पोपट, पर्यावरण, पाऊस, फुलपाखरू, चाफेकळी अशा कवितेतून निसर्ग आणि पर्यावरणाचे महत्त्व विशद केले आहे या कवितेतून निसर्गा विषयी मुलांना ओढ व प्रेम उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. माणसाप्रमाणेही आकाशातही दिवाळी साजरी होते या कवितेतून आकाशातल्या वेगवेगळ्या परिसंस्थेचे वर्णन कवितेतून कवीने केले आहे
वीज म्हणाली माझं ऐका
घाबरू नका कोणी गडे
मोठ्या मोठ्या आवाजाचे
मीच फोडीन फटाकडे
असा आकाशातला दिवाळीचा सण पाहून भारावून गेल्याशिवाय राहत नाही.
‘घर’ या कवितेतून मानव, पक्षी, प्राणी यांना आपले घरटे कसे प्रिय असते ते दिसून येते कवी लिहितो.
म्हणून म्हणतो बाळा ऐक
एवढेच एक ध्यानी धर
कितीही बलवान असला तरी
मोडू नये कधी कुणाचं घर
प्रत्येक कविता आहे मुलांना त्यांचे भावविश्व अधिक प्रभावित करीत जाते.
मला वाटते,शाळा, जयजय भारत माता, थोर वारसा, नका आम्हाला छोटे समजू, नांदवू जगी शांतता अशा कवितेतून राष्ट्रप्रेरणेची ज्योत मुलांमध्ये चेतना देऊन जाते .
जाती धर्मा पलीकडे
मनी वसे बंधुता
आन आम्हा मातृभूची
नांदवू जगी शांतता
राष्ट्र प्रेरणा
ही प्रत्येकाच्या मनात जागृत भावना असणे आवश्यक असल्याचे अशा कवितेमधून सादर होते.
.कवी सचिन बेंडभर शिक्षक या नात्याने मुलांचा ऋणानुबंध जपताना दिसत आहेत. गेली पंधरा वर्षाहून अधिक बालसाहित्य विषयक त्यांचे लिखाण वाखण्याजोगे आहे. कवितेतून होणारे निसर्गाची उधळण ही बाल मनाला भावते. हेच कवीचे श्रेष्ठत्व सिद्ध करते.
बालमनाला जे हवे ते हत्तीची सहल मधून मिळाल्याचे साध्य होते.
या बालकाव्यसंग्रहाचे सुंदर व आकर्षित करणारे मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार प्रतीक काटे यांनी उत्कृष्ट पद्धतीने साकारले आहे, तर पुस्तकातील सर्वच कविता चित्रमय व रंगीत आहेत. या पुस्तकाची सजावट सान्वी ग्राफिक्स बजरंग लिंबारे यांनी केली आहे. त्यामुळे पुस्तकाला एक उत्तम असा रंगीत साज चढला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका संगीता बर्वे यांनी या काव्यसंग्रहाला अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना दिली असून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक, प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी पुस्तकाची पाठ राखण केली आहे. पानोपानी बालकाव्यसंग्रातून लहान मुलांचे भावविश्व फुलवून येताना दिसते अशा बालकाव्यसंग्रहाला व बेंडभर यांच्या साहित्यिक वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.






Users Today : 36
Users Yesterday : 261