शिरूर प्रतिनिधी :
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी काळाच्या गरजा ओळखून कौशल्यक्षम अभ्यासक्रमांची निवड करुन आपला देश व समाजाला स्वावलंबी बनविण्यासाठी योगदान द्यावे असे प्रतिपादन सी.टी.बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य तथा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राचे प्रमुख डॉ.के.सी.मोहिते यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सी.टी.बोरा महाविद्यालयाच्या अभ्यासकेंद्रातील शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये विविध शिक्षणक्रमांसाठी नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रेरण कार्यक्रम किंवा इंडक्शन प्रोग्रॅम कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर अभ्यासकेंद्र संयोजक डॉ.अंबादास केत, अभ्यासकेंद्राचे मार्गदर्शक प्रा.चंद्रकांत धापटे, डॉ.मंदा भालेकर यांची उपस्थिती होती.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला डॉ. मोहिते यांनी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरु व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.राम ताकवले यांच्या आठवणींना व त्यांच्या मुक्त व दूर शिक्षणातील योगदानाला उजाळा दिला. डॉ. ताकवले तसेच समाज व शिक्षणक्षेत्रातील अन्य नामवंत व्यक्तींच्या उदाहरणांसह कोणतीही नवीन बाब शिकण्यासाठी वय हा निकष महत्वाचा नसून प्रत्येक व्यक्ती जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत नवनवीन बाबी शिकत असते असे प्रतिपादन केले. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कधीतरी निराशेचा टप्पा येत असतो. जीवनात निराशा आल्यास खचून न जाता विद्यार्थ्यांनी शांतपणे विचार करावा आणि थोडासा विश्राम घेऊन नवीन उर्जा व शक्ती प्राप्त करुन नव्या वाटा चोखाळाव्यात असे प्रतिपादन केले. आपल्या भाषणात पुढे बोलताना डॉ. मोहिते म्हणाले की, शिक्षणक्रमांची लवचिकता, दर्जेदार अध्ययन साहित्य, कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रम, समाजाभिमुखता ही मुक्त विद्यापीठाची बलस्थाने असून विद्यार्थ्यांनी याचा आपल्या व्यक्तीमत्वाच्या विकासासाठी उपयोग करुन घ्यावा तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिलेल्या दुहेरी पदवीच्या संधीचा लाभ घेऊन आपली शैक्षणिक पात्रता वाढवावी असा सल्ला दिला. आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी जीवनात ज्ञान, जिज्ञासा व नाविन्याचा ध्यास या बाबींना महत्व असून विद्यार्थ्यांनी शिक्षक , पालक व मार्गदर्शकांच्या मदतीने नव्या युगाच्या गरजा ओळखून ज्ञान व कौशल्ये प्राप्त केल्यास जीवनात नक्की यश मिळते असा विश्वास व्यक्त करुन
विद्यार्थ्यांनी केवळ भौतिक सुखाच्या मागे न लागता, कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय भान व जबाबदा-यांची जाणीव ठेवून वाटचाल करावी असा संदेश दिला.
याप्रसंगी अभ्यासकेंद्राचे मार्गदर्शक प्रा.चंद्रकांत धापटे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुक्त विद्यापीठातील विद्यार्थी हे विविध वयोगटातील असून अशा बहुजिनसी गटाचे समुपदेशन करणे हे संमंत्रकाच्या दृष्टीने आनंददायी व तितकेच आव्हानात्मक काम असल्याचे प्रतिपादन केले.
मुक्त विद्यापीठाला समाजात मान व स्थान असून विद्यापीठाच्या शिक्षणक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनीच विद्यापीठातील शिक्षणक्रमांचे प्रचारक व प्रसारक म्हणून काम करावे. ‘मी आलोय तुही चल’ हा नवा मंत्र घेऊन विद्यार्थ्यांनीच विद्यापीठाचे ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीद समाजापर्यंत पोहचवावे असे प्रतिपादन केले. या इंडक्शन कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभ्यासकेंद्राचे संयोजक डॉ.अंबादास केत यांनी केले. यावेळी त्यांनी इंडक्शन कार्यक्रमाचा उद्देश सांगून अभ्यासकेंद्रावर उपलब्ध असलेले विविध शिक्षणक्रम व अभ्यासपूरक उपक्रम यांची माहिती दिली. तसेच मुक्त विद्यापीठाची पदवी ही इतर विद्यापीठाच्या समकक्ष असून विद्यार्थ्यांनी जास्तीत संख्येने प्रवेश घेऊन विद्यापीठाच्या सर्व उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन प्रातिनिधिक स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना विद्यापीठ, अभ्यासकेंद्र व शिक्षणक्रम व इतर उपक्रम याबाबत आपली मते व प्रश्न मांडण्याची संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उपस्थित मान्यवरांनी समाधानकारक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. याप्रसंगी डॉ.मंदा भालेकर, श्रीमती सुजाता हणमंते यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. .प्रा.डॉ.आप्पासाहेब बेळ्ळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. श्रीमती सुजाता हणमंते यांनी कार्यक्रमाचे आभार मानले . या कार्यक्रमासाठी अभ्यासकेंद्राचे संमंत्रक प्रा.डॉ.अरुण दिवटे, प्रा.डॉ.अशोक काकडे,केंद्रसहाय्यक
निळोबा भोगावडे, बाळू जाधव यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमांत विविध शिक्षणक्रमांसाठी प्रवेश घेतलेले सुमारे १२० पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
