अंधारातच गणेश विसर्जनामुळे गणेशभक्तांची नाराजी
गणेश विसर्जनावेळी भीमा नदीपात्रात सुरक्षेचा बोजवारा, संतप्त भक्तांचा सवाल – अपघात झाला तर जबाबदार कोण?
कोरेगाव भिमा: प्रतिनिधी(विनायक साबळे)
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) :
गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी कोरेगाव भीमा येथील भीमा नदीपात्रात विसर्जनावेळी अक्षरशः अंधाराचे साम्राज्य पसरले. स्ट्रीट लाईट बंद असल्याने गणेशभक्तांना जीव मुठीत धरून विसर्जन करावे लागले. महिलांपासून लहान मुलांपर्यंत असंख्य भक्तांना वाहनांचे हेडलाईट लावून आरती म्हणण्याची वेळ आली. या घटनेमुळे ग्रामपंचायतीच्या गालथान कारभाराचा उघड झाला आहे.
दिवसभर कारखान्यांचे गणपती तसेच घरगुती व गौरी गणपतींचे विसर्जन मोठ्या उत्साहात सुरू होते. मात्र, सायंकाळी कामगार वर्ग विसर्जनासाठी पोहोचल्याने गर्दी वाढली आणि त्याचवेळी सुरक्षेच्या व्यवस्थेचा बोजवारा उघड झाला. नदीपात्र परिसरात अवघे दोनच खांबांवरील दिवे सुरू होते, तर प्रत्यक्ष नदीत प्रकाशयोजनेची कोणतीही सोय नव्हती. अंधारात वाहत्या पाण्यात उतरलेल्या भक्तांचा जीव धोक्यात आला होता.
सणासुदीच्या काळात एवढ्या महत्त्वाच्या ठिकाणी प्रकाशव्यवस्था बंद असणे हे ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाचे ठळक उदाहरण असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. “अंधारात विसर्जन करताना एखादा अपघात झाला तर जबाबदार कोण?” असा थेट सवाल भक्तांकडून करण्यात आला.
गणेशभक्तांनी ग्रामपंचायतीला धडा शिकवण्याचा इशारा देत तातडीने स्ट्रीट लाईट कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पाण्यात प्रकाशयोजना करण्याची ठाम मागणी केली आहे.
