शिक्रापूर प्रतिनिधी:विनायक साबळे
शिक्रापूर परिसरात सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईत कुख्यात घरफोडी प्रकरणातील आरोपी लखन भोसले पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला. लखन भोसले हा खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील रहिवासी असून त्याच्यावर सातारा, सांगली, पुणे यांसह इतर जिल्ह्यांमध्ये दरोडे, घरफोडी, चोरी आणि मारहाणीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते.
काही दिवसांपूर्वीच त्याने एका महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास केले होते, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.
गेल्या काही दिवसांपासून शिक्रापूर परिसरात वाढलेल्या घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी विशेष पथक तयार करून संशयित आरोपींच्या हालचालींवर नजर ठेवली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता, अटक करण्यासाठी गेलेल्या चार पोलिसांवर लखन भोसलेने शस्त्रासह हल्ला केला. या हल्ल्यात चार पोलीस जखमी झाले. आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात लखन भोसले जागीच ठार झाला.
या कारवाईदरम्यान भोसलेचा दुसरा साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी मोठी मोहीम सुरू केली आहे. लवकरच त्याला अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
