कोरेगाव भिमा प्रतिनिधी(विनायक साबळे)
दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या ७९ व्या स्वातंत्र्यदिन ध्वजवंदन सोहळ्यात उपस्थित राहण्याचा मान कोरेगाव भिमाचे सरपंच संदीप ढेरंगे यांना सपत्नीक मिळाला आहे. महाराष्ट्रातून निवड झालेल्या अवघ्या १७ सरपंचांपैकी पुणे जिल्ह्यातून निवडले गेलेले ते एकमेव सरपंच ठरले असून, ही निवड त्यांच्या असामान्य कार्याची मोठी पोचपावती मानली जात आहे.
सलग दोन वेळेस सरपंच पद
संदीप ढेरंगे हे दुसऱ्यांदा सरपंचपद भूषवित असून, “स्मार्ट कोरेगाव भिमा” या संकल्पनेतून गावच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न, शासनाकडून निधी मिळवणे, तसेच पाणी प्रकल्पासाठी वनजमीन उपलब्ध करून देणे या कामगिरीची दखल थेट दिल्लीपर्यंत पोहोचली. एका शेतकऱ्याच्या मुलाने उद्योजक बनून घेतलेली ही भरारी आणि आता देशाच्या सर्वोच्च पातळीवर मिळालेला हा सन्मान, कोरेगाव भिमा गावासाठी अभिमानाचा क्षण आहे.
