धाराशिव मधील बालसाहित्यिक मित्र समाधान शिकेतोड आणि मी गेल्या सहा सात वर्षापासून मेसेज व फोनवर बोलत होतो.
फ़ोन वरील मैत्री:
काल पुण्यात आल्यानंतर त्यांनी मला फोन केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वर्ष बोलत असलो तरी काल पहिल्यांदाच आमची प्रत्यक्ष भेट झाली. पण जणू काही आम्ही वर्गमित्र आहोत असेच आम्हाला भासत होते.
बालसाहित्यिक संजय ऐलवाड आणि मी त्यांच्याबरोबर आजच्या काळातील बालसाहित्य या विषयावर तब्बल दोन तास चर्चा केली. जेवण आणि चहापाणी झाल्यावर सरांनी आमचा निरोप घेतला. मीही घरी निघालो असल्याने जाता जाता तुम्हाला पुणे स्टेशनला सोडतो, म्हणून त्यांना गाडीत घेतले. यवतमाळला जाण्यासाठी सात वाजता त्यांना गाडी होती.
पुण्यातील ट्रॅफिक पेक्षा माणूस वेगवान चालतो:
साडेसहा वाजता केसरीवाड्यातून संजय सरांचा निरोप घेऊन निघाल्यानंतर आपण अगदी आरामशीर जाऊ असे म्हणत गप्पा मारत आम्ही पुणे स्टेशनला निघालो. तेव्हा अगदी दीड किलोमीटर राहिले असताना गाडी वीस मिनिटात येणार असल्याचे समजले. पुणे स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर होते. सुरुवातीला आपण आरामात जाऊ असे वाटले. अगदी दीड किलोमीटर राहिले असताना पुण्यातील ट्रॅफिकमध्ये पंधरा मिनिटे तिथेच गेली. अगदी पाच मिनिटात गाडी स्टेशनला येणार होती. पाच मिनिटात मी दीड किलोमीटर धावत जाऊ शकतो, असे म्हणत सरांनी मला विचारले.
दिड किलोमीटर अंतरावर पाच मिनिटात चालणारे सर:
माझाही नाईलाज झाला. पण पाच मिनिटात दीड किलोमीटरचा पल्ला गाठता येईल का असा प्रश्न मी विचारताच ते फक्त गालातच हसले आणि गाडीतून उतरले. पुण्यातल्या गर्दीत ते कुठे गायब झाले हे समजले नाही. पुढे ट्रॅफिक नसेल तर रिक्षा करा हे सांगण्यासाठी मी त्यांना कॉल करत होतो पण त्यांनी कॉलही उचलला नाही. गाडी मिळेल की नाही अशी शंका सारखी मनात येत होती. आपल्यामुळे सरांना उशीर झाला या विचाराने मन व्यतीत झाले. आता पाच मिनिटे होण्याची मी वाट पाहू लागलो. कधी एकदा पाच मिनिट होतात आणि त्यांचा कॉल येतो असं झालं होतं. गाडी मिळाली हा एकच शब्द ऐकण्यासाठी मी आतुर झालो होतो. एक एक मिनिट अगदी तासाप्रमाणे भासत होता. सोबत अपराधीपणाची भावना होतीच. आपल्यामुळे जर सरांची गाडी गेली तर? ही चिंता सतत सतावत होती. अन् अगदी पाचव्या मिनिटालाच सरांचा फोन आला. सर गाडी मिळाली हे शब्द त्यांच्या तोंडून ऐकताच मी गणरायाला हात जोडले. दिवसभराचा थकवा एका क्षणात नाहीसा झाला. अगदी पाच मिनिटात दीड किलोमीटरचे अंतर कापणाऱ्या त्या धाराशिवच्या वाघाला मी मनोमन सलाम ठोकला.
