शिरूर प्रतिनिधी:
मराठी बालसाहित्यात सचिन बेंडभर हे एक महत्त्वाचे लेखक म्हणून अधोरेखित झालेले आहेत. त्यांनी मराठी बालसाहित्यात कथा, कविता, कादंबरी, अनुवाद आणि समीक्षा इत्यादी साहित्य प्रकारात विपुल लेखन कार्य केलेले आहे. मुलांचे भाव विश्व लक्षात घेऊन त्यांच्या मनोरंजनासाठी आणि त्यांना बोधामृताचा लाभ देण्यासाठी मुलांना सुचेल पचेल अशा भाषेत बालसाहित्याचे लेखन करून आपल्या नावाचा ठसा उमटवलेला आहे.
*करील मनोरंजन जो मुलांचे*
*जडेल नाते प्रभुशीत तयाचे*
अशी पद्यपंथी सर्वश्रुत आहे. या काव्य वचनास अनुसरून वाघोबाचा मोबाईल या पुस्तकाच्या माध्यमातून अफलातून अशी कल्पना घेऊन हा कवी आला आहे. कल्पना आणि भावना यांचा सुरेख मिळ म्हणजे कविता होय. याला बालकविताही अपवाद नाही. वाघोबाचा मोबाईल या काव्यसंग्रहातील एकूणच कवितांतून आपल्या अचाट कल्पनाशक्तीचा परिचय तर ते देताय पण त्याचबरोबर मुलांच्या भाविश्वाशी रमामान होऊन त्यांचे मनोरंजनही करतात.
वाघोबाचा मोबाईल या शीर्षक कवितेमध्ये आपल्या बछड्याच्या वाढदिवसासाठी सगळ्या प्राण्यांना मोबाईलवरून कॉल करून बोलावण्याची इच्छा आहे. त्यानुसार ते वानर, सिंह, हत्ती, कोल्हा यांना कॉल करतात. पण वानर रॉंग नंबर म्हणते तर सिंहांनी फोनचा स्विच बंद केला आहे. हत्तीच्या मोबाईलला रेंज नाही तर कोल्होबांनी मेसेज पाठवून शुभेच्छा दिल्या. कोणीच वाढदिवसासाठी येत नाही तेव्हा वाघोबा म्हणतो,
*वाघ म्हणे येईना कोणी*
*सर्वांनाच कॉल करा*
*फोन मधून आवाज आला*
*बॅलन्स अपुरा रिचार्ज करा*
पण अपुरा बॅलन्स असल्याने रिचार्ज करण्याचा आवाज फोन मधून आल्याने वाघोबाची फजिती झाल्याची दिसून येते.
आई, आजोबा, बाळ अशा काही कौटुंबिक भाऊ संबंध उलगडून दाखवण्याचा कवितांचा समावेश यामध्ये आहे. मुलांवर सुसंस्कार करण्याचे कार्य कौटुंबिक परिघात होत असते. त्याचे प्रत्यंतर या कविता वाचल्यानंतर येते. सांगशील का ग आई या कवितेत चिमुकली आपल्या आईला तिला पडलेल्या प्रश्नांची विचारणा करत आहे.
बालमनाला सूर्य, चंद्र, तारे आणि पाऊस या संदर्भात पडलेल्या प्रश्नांची मालिका येथे आस्वादावयास मिळते. तर सांग ना मम्मी या कवितेत आईची माया, ममता, काळजी, प्रेम ते अभिव्यक्त करतात. मुलांच्या जीवनात आजी आजोबांचे स्थान खूपच महत्त्वाचे असते. ती संस्काराची विद्यापीठेच असतात. आजोबा आपल्या नातवंडांची काळजी घेतात असा आशयभाग आजोबा या कवितेतून अविष्कृत झालेला आहे.
*अभ्यासाला रोज बसून*
*वाचून घेतात कविता धडे*
*पाटीवरती काढ म्हणतात*
*शंभर पर्यंत सगळे पाढे*
आजोबा नातवंडांच्यावर केवळ माया करीत नाहीत तर त्यांचा अभ्यासही घेतात. आमचं बाळ ही कविता बाळलीला व्यक्त करते. गुणाची लाडकी ही कविता ही चिमुकलीच्या बोलण्याच्या, चालण्याच्या, नटण्याच्या गोष्टींची दुखल घेते. बाळाचे मित्र चिऊ, काऊ, मोर, कोंबडी, पोपट इत्यादी आहेत. त्यांची बाळाशी होणारी हितगुज कवीने अचूक टिपली आहे.
आजोळ आणि मामाविषयी बालकांना नेहमीच ओढ राहिलेली आहे. सुट्टी लागली की हमखास बालचमूंची पावले मामाच्या गावाकडे वळतात. मामाच्या मळा या कवितेत ते म्हणतात,
*माझ्या मामाचा हा मळा*
*हिरव्या रंगात नाहला*
*आंबा चिकू फणसाचा*
*खेळ वाऱ्याशी रंगला*
तर आजोळ या कवितेत मामाच्याच मळ्यातील घटना घडामोडी बरोबर घटकांचीही दखल कवीने घेतली आहे. बदललेल्या कृषी संस्कृती बरोबर गाव खेड्याचही बदलते चित्र यात आले आहे.
लहान मुलांना प्राणी पक्ष्यांविषयी विशेष ओढ असते. हाच धागा लक्षात घेऊन हुशार कावळा, आमचा कोंबडा, पाखरशाळा या कविता विशेष उल्लेखनीय आहेत. यातून कल्पना भावना आणि बोध यांचा कवीने सुंदर मेळ साधल्याचे दिसून येते. तर पावसाची सर, चांदोमामा, कोण सांगतेय यातून बालसुलभ प्रश्नांची चर्चा व बालमनातील कल्पनांचा परिचय करून दिला आहे.
वाघोबाचा मोबाईल हा विषय वैविध्याने नटलेला कवितासंग्रह आहे. साधी सोपी शब्द रचना, आकलनसुलभ भाषा, यमकरी अलंकारांची योजना उगवती शैली यामुळे हा कवितासंग्रह वाचनीय झाला आहे मुलांच्या चिमण्या विश्वावर त्यांना पडणाऱ्या प्रश्नांवर, आवडणाऱ्या गोष्टींवर काव्यरूपात अविष्कृत झाल्याबद्दल कवी सचिन बेंडभर यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील लेखन कार्यास हार्दिक शुभेच्छा..!
[डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील*
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक,
राज्य शासन पुरस्कार प्राप्त लेखक.]
