कारेगाव प्रतिनिधी: अमोल कोहकडे
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून महाराष्ट्राला विविध संतांची परंपरा लाभलेली आहे. समस्त संत आणि वारकरी सांप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्रीहरी पांडुरंगाच्या आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यसह राज्या बाहेरूनही बहुसंख्येने सर्व जाती धर्माचे वारकरी वेगवेगळ्या दिंड्या आणि पालख्या घेऊन पायी चालत पंढरपूरच्या पायी वारीला दरवर्षी येत असतात.
अनेक वर्षांपासून चालू असलेली ही वारकऱ्यांची परंपरा अखंड चालू राहण्यासाठी मुला मुलींना लहान वयातच वारीचे महत्त्व कळणे आवश्यक असल्याने तसेच त्यांच्या मनात बालपणापासूनच चांगले संस्कार रुजविण्यासाठी माईलस्टोन ज्ञानपीठ संस्थेच्या कारेगाव तालुका शिरूर येथील
‘माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूल’ या इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सर्व मुला मुलींच्या बाल दिंडीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी व कार्यकारी संचालक राजाराम पाटील सोनवणे यांनी दिली.
याप्रसंगी उपस्थित बाल चिमुकल्या ,वारकऱ्यांचा उत्साह आणि विविध संतांच्या वेशभूषा पाहून आपण भारावून गेलो असल्याचे मत या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले कारेगाव येथील शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अमोल कोहकडे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
विठ्ठल रुक्मिणी आणि संत आणि वारकऱ्यांच्या पारंपारिक वेशात तहानभूक हरपून अभंगाच्या तालावर दंग होऊन नाचणाऱ्या ह्या बाल वारकऱ्यांना पाहून खरोखरच येथे आज विठ्ठल नामाची शाळा भरल्याचे जाणवत आहे असे मत संस्थेचे अध्यक्ष सुनीलशेठ ओस्तवाल यांनी या कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
माईलस्टोन अक्षरवारी अर्थात बालदिंडी सोहळा 2025 या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यामध्ये महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेच्या जिल्हा समन्वयक सौ मीनाताई गवारे, कारेगाव येथील शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अमोल कोहकडे, माइल स्टोनचे अध्यक्ष सुनील शेठ ओस्तवाल, कोमल कम्प्युटर्सचे नवले सर,गोविंद ढगे, माइल स्टोनचे संस्थापक सेक्रेटरी आणि कार्यकारी संचालक राजाराम पाटील सोनवणे तसेच माईलस्टोन च्या संचालिका व कारेगाव शाखेच्या प्रिन्सिपल सौ कांचन सोनवणे पाटील यांच्यासह माईलस्टोन चे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य पालक व विद्यार्थी बालमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीप प्रज्वलन:
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि संत प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून श्री विठ्ठलाच्या आरतीने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शाळेपासून जवळ असलेल्या श्री दत्त मंदिरापर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी पारंपारिक पद्धतीने टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनाम घेत पालखी खांद्यावर घेऊन मोठ्या उत्साहात दिंडी सोहळा काढला. त्यामध्ये गोल रिंगण करून मुलींसह सर्व शिक्षिका व महिला पालकांनी देखील फुगडी चा मनमुराद आनंद लुटला. इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही बालदिंडीसारखा सोहळा आयोजित करून संत परंपरा मुलांच्या मनामध्ये रुजवण्यासाठी शाळेने आयोजित केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सौ मीनाताई गवारे यांनी खूप कौतुक केले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अमोल कोकडे यांच्यावतीने सर्व बाल वारकऱ्यांना केळीचे वाटप करण्यात आले. तसेच पालक गोविंद ढगे यांच्या सौजन्याने संत प्रतिमा आणि पालखी साठी लागणारे पुष्पहार पुरविण्यात आले.
सूत्रसंचालन व आभार:
याप्रसंगी स्वागत आणि प्रास्ताविक माईलस्टोन ज्ञानपीठ चे संस्थापक सेक्रेटरी व कार्यकारी संचालक राजाराम पाटील सोनवणे यांनी केले, सूत्रसंचालन प्रिन्सिपल चौक कांचन सोनवणे मॅडम यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष सुनील ओस्तवाल यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
