सरदवाडी प्रतिनिधी:दत्तात्रय कार्डिले
साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या ‘सकाळ’ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या चार पुस्तकांचे प्रकाशन माधव गोखले आणि ज्येष्ठ बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते शुक्रवारी, ‘भावार्थ’ पुणे येथे संपन्न झाले.
मुलांसाठी ‘साप्ताहिक सकाळ’मधून वर्षभर लिहिलेल्या कथांचे ‘अखेर सापडली वाट’, ‘मनी वसे ते स्वप्न दिसे’, ‘घरभर दरवळणार सुगंध’ हे तीन बालकथासंग्रह ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले आहेत.
मुलांना कवितेतून कोडी घालण्याचा खेळ खेळण्यासाठी आव्हाड यांनी लिहिलेल्या ‘ज्ञानरंजक काव्यकोडी’ या पुस्तकाचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.
माधव गोखले यांनी आपल्या मनोगतात आव्हाड यांच्या बालकथांची वैशिष्ट्ये सांगताना म्हणाले, की आजच्या मुलांचे भावविश्व आव्हाड यांच्या कथांमध्ये एकवटलेले दिसून येते. म्हणून मुलांना त्यांच्या कथा ह्या आपल्या वाटतात.
डॉ. सुरेश सावंत यांनी आव्हाड यांचे लेखन हे मुलांना मनोरंजनाबरोबरच सहजशिक्षणाकडे नेणारे आहे. मुलं त्यांच्या साहित्यात रममाण होताना मी पाहिली आहेत. कारण त्यांचे बालसाहित्य अतीव बालनिष्ठेने लिहिलेले आहे. त्यांच्या एकूण पुस्तकांवर मी लवकरच एक समीक्षाग्रंथ लिहिणार आहे.
एकनाथ आव्हाड यांच्या बालसाहित्य निर्मितीमागे बालनिष्ठा हा घटक महत्त्वाचा असल्याचे डॉ. सुरेश सावंत यांनी यावेळी नमूद केले.
मुलांसाठी लेखन केलेली पुस्तके:
नाट्यछटा, काव्यकोडी, चरित्रलेखन, कथा आणि कविता या सर्वच साहित्यप्रकारांत आव्हाड यांनी मुलांसाठी सकस आणि दर्जेदार लेखन केले असून त्यांनी बालनाट्यही लिहावे असेही त्यांनी यावेळी सुचवले.
प्रकाशनानंतर ‘भावार्थ’च्या प्रमुख कीर्ती जोशी यांनी आव्हाड यांची प्रकट मुलाखत घेतली. मुलाखतीच्या अनुषंगाने आव्हाड यांनी त्यांचे बालपण, वाचनाची आवड, लेखनाची सुरुवात, लेखनात केलेले विविध प्रयोग, कथाकथनाचे कार्यक्रम आणि कार्यशाळा, वाचकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद अशा अनेक गोष्टींची माहिती दिली. काही कवितांचे सादरीकरण केले. ही मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली. शेवटी सर्वांचे आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाला ज्येष्ठ बालसाहित्यकार बाळकृष्ण बाचल, ज्येष्ठ पत्रकार सुभाष नाईक, विश्वास प्रकाशनाच्या प्रमुख वैशाली पेंडसे कार्लेकर, वर्षा आठवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
