पुणे प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील मातोश्री कै .सौ. केवळबाई
मिरेवाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठी साहित्यातील बालसाहित्य या विभागात दरवर्षी साहित्यिकांना पुरस्कार दिले जातात. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून या वर्षी बालसाहित्य विभागात पिंपळे जगताप ता.शिरूर येथील सचिन बेंडभर यांच्या मामाच्या मळ्यात या दिलीपराज प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या बालकाव्यसंग्रहाला घोषित करण्यात आला आहे. दोन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह ,प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जेष्ठ साहित्यिक डॉ.अशोक कौतिक कोळी, संपादक पांडूरंग पुठ्ठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षण समितीने या पुरस्काराची निवड केली आहे.
मातोश्री कै.सौ.केवळबाई मिरेवाड पुरस्काराचे संयोजक वीरभद्र मिरेवाड यांनी या पुरस्कारांची घोषणा मातोश्रीच्या पुण्यस्मरणदिनी सोळा जुलै रोजी नायगाव येथे केली. लवकरच एका विशेष समारंभात नांदेडचे लोकप्रिय खासदार वसंतराव पाटील चव्हाण, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ, जगदिश कदम ,कवी तथा वाघूरचे संपादक नामदेव कोळी, इसाप प्रकाशनचे संचालक दत्ता डांगे, बरबडा नगरीचे माजी सरपंच बालाजी मदेवाड यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
सचिन बेंडभर यांच्या काव्यसंग्रहास 2023 सालचा हा सहावा सन्मान असून याआधी चंद्रपूर येथील कवितेचे घर यांच्या वतीने बापूरावजी पेटकर बालकाव्य पुरस्कार, ऍक्टिव्ह टीचर सामाजिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या वतीने उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार, साहित्य सेवा प्रज्ञा मंच यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङमय पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दामाजीनगर यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा संभाजी सलगर पुरस्कृत ज्ञानोबा सलगर स्मृती पुरस्कार आणि सारांश मासिकाकडून उत्कृष्ट काव्य निर्मिती पुरस्कार असे प्रतिष्ठेचे मानले जाणारे पुरस्कार या बालकाव्यसंग्रहास मिळाले आहेत. या काव्यसंग्रहासाठी 2023 सालचा हा मानाचा सहावा सन्मान असून या काव्यसंग्रहास निवड समितीने मातोश्री कै .सौ. केवळबाई मिरेवाड वाड्.मय पुरस्कार जाहीर केला आहे.
मामाच्या मळ्यात या काव्यसंग्रहात लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक कविता असून त्यांच्या ज्ञानात भर पडेल अशा प्रेरक कवितांचा समावेश आहे. लहान बाल चमुंसाठी संस्काराची शिदोरी म्हणजे सचिन बेंडभर पाटील यांचा मामाच्या मळ्यात हा काव्यसंग्रह!
दिलिपराज प्रकाशनने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला असून प्रसिद्ध चित्रकार सागर नेने यांनी विषयाला अनुरूप चित्रे व आकर्षक मुखपृष्ठ रेखाटले आहे. प्रसिद्ध बालसाहित्यिक सुरेश सावंत यांनी या पुस्तकाची पाठराखण केली आहे.
सचिन बेंडभर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
