प्रतिनिधी. संतोष साळुंके
मांडवगण फराटा येथील विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी; २ सुवर्ण, ७ रौप्य व ९ कांस्य पदकांची कमाई
:नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय युद्धकला स्पर्धेत मांडवगण फराटा येथील राजमाता जिजाऊ आखाड्यातील विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. विविध साहसी आणि पारंपरिक युद्धकला क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत आखाड्यातील विद्यार्थ्यांनी तब्बल २ सुवर्ण, ७ रौप्य आणि ९ कांस्य पदके मिळवून मांडवगण फराटा गावाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले.
या स्पर्धेत एकेरी काठी, दुहेरी काठी, भाला, दांडपट्टा यांसारख्या साहसी युद्धकला क्रीडा प्रकारांचा समावेश होता. या विविध प्रकारांमध्ये राजमाता जिजाऊ आखाड्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत पदकांची लयलूट केली.

या स्पर्धेत श्रीराज फराटे, आराध्या शितोळे, आर्या इथापे, काव्या वाळुंज, वैष्णवी ढवळे, दिव्यंम् शितोळे, वेदांत निंबाळकर, अनुष्का फराटे, वैजयंती गवळी, कादंबरी फराटे, वैष्णवी काळे आणि श्रावणी घुले या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली व पदके प्राप्त केली.
अवघ्या तीन वर्षांच्या कावेरीने वेधले लक्ष:
या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरली ती अवघ्या तीन वर्षांची चिमुकली कावेरी शितोळे. एवढ्या लहान वयात युद्धकलेच्या स्पर्धेत सहभाग घेऊन तिने आपल्या कौशल्याची झलक दाखवली. तिच्या सहभागाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले असून, कावेरीच्या धाडसाचे आणि आत्मविश्वासाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

राजमाता जिजाऊ आखाड्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक धनश्री शितोळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नियमित सराव,शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर ही उल्लेखनीय कामगिरी केली.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालक ,ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी आणि तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
राष्ट्रीय युद्धकला स्पर्धेत मिळवलेल्या या यशामुळे राजमाता जिजाऊ आखाड्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.






Users Today : 234
Users Yesterday : 787