शिरूर प्रतिनिधी:सुदर्शन दरेकर
पुणे जिल्ह्यासह अहिल्यानगर, मराठवाडा आणि पूर्व महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा पुणे–शिरूर उन्नत महामार्ग प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. देशातील सर्वांत मोठा उन्नत (Elevated) महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे ते शिरूर हा प्रवास केवळ 45 मिनिटांत पूर्ण होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा बहुचर्चित प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून लवकरच भूमिपूजन व उद्घाटनाचा मुहूर्त निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य शासन आणि संबंधित विभागांकडून प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर येत आहे.
53.4 किलोमीटरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
पुण्यातील खराडी येथून सुरू होणारा हा महामार्ग थेट शिरूरपर्यंत जाणार असून प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे 53.4 किलोमीटर इतकी असेल. त्यापैकी 35.12 किलोमीटरचा भाग हा उन्नत सहापदरी (6 Lane Elevated Corridor) असणार आहे. या महामार्गामुळे पुणे–नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
विशेषतः वाघोली, लोणीकंद, रांजणगाव, शिक्रापूर आणि शिरूर परिसरातील नागरिकांना दररोजच्या वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच औद्योगिक क्षेत्र, लॉजिस्टिक पार्क आणि व्यावसायिक वाहतुकीलाही मोठी चालना मिळणार आहे.

7 हजार 300 कोटींचा खर्च:
या प्रकल्पासाठी सुमारे 7 हजार 300 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक मानला जात आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते अहिल्यानगर आणि पुढे मराठवाड्याकडे जाणारा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे.
मेट्रो आणि महामार्ग एकाच मार्गावर:
या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नियोजित रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्ग याच उन्नत महामार्गावरून जाणार आहे. यासाठी सुमारे 11.6 किलोमीटरचा दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार असून त्यामध्ये खालच्या स्तरावर महामार्ग तर वरच्या स्तरावर मेट्रो मार्गाची सुविधा असेल. त्यामुळे पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठी क्रांती घडण्याची शक्यता आहे.
उद्घाटनाचा मुहूर्त कधी?
महामार्गाच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी लवकरच या प्रकल्पाचा शुभारंभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय मंजुरी, निविदा प्रक्रिया आणि तांत्रिक आराखडे अंतिम टप्प्यात पोहोचल्याने आगामी काही महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.




Users Today : 3
Users Yesterday : 184