शिरूर प्रतिनिधी -सुदर्शन दरेकर
दि. 26 मे 2026 : शहरातील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना मोकळे रस्ते उपलब्ध व्हावेत या उद्देशाने शिरूर नगरपरिषद यांच्या वतीने सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली.
आज दि. 26 मे रोजी राम आळी परिसरातील मुळे हॉस्पिटल ते डंबेनाला, सुभाष चौक, हलवाई चौक, मारुती आळी या मुख्य बाजारपेठ भागात रस्त्यावर व पदपथांवर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये पत्र्याचे शेड, दुकानांसमोरील बेकायदेशीर वाढीव बांधकामे तसेच विविध फलक हटविण्यात आले.

यापूर्वी दि. 25 मे रोजी पाबळ फाटा ते बी.जे. कॉर्नर, बी.जे. कॉर्नर ते तहसील कार्यालय, सी.टी. बोरा कॉलेज रोड, रेव्हेन्यू कॉलनी तसेच सेंटर दवाखाना रोड परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली होती. या दोन दिवसांच्या मोहिमेमुळे शहरातील मुख्य रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
नगरपरिषद प्रशासनाच्या माहितीनुसार, 25 व 26 मे या दोन दिवसांत एकूण 177 पेक्षा अधिक अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मा. पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उपनिरीक्षक श्री. हनुमंत नखाते यांच्यासह महिला व पुरुष पोलीस पथक मोहिमेदरम्यान तैनात होते.
ही मोहीम मुख्याधिकारी श्री. प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. मोहिमेत प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, नगर अभियंता समाधान मुंगसे, पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे, कर निरीक्षक माधव गाजरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व 100 हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते.

शिरूर नगरपरिषदेच्या वतीने व्यापारी व नागरिकांना रस्ते व पदपथांवर अतिक्रमण न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहर स्वच्छ, सुंदर व वाहतूक कोंडीमुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले. तसेच पुढील काळातही अतिक्रमण विरोधी मोहीम नियमित सुरू ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.





Users Today : 3
Users Yesterday : 184