भैरवनाथ विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची ३५ वर्षांनंतर भरली भावनिक शाळा –

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
“खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे…” साने गुरुजींच्या या प्रार्थनेचे सूर जेव्हा नगर-पुणे रस्त्यावरील राधाकृष्ण मंगल कार्यालयात घुमले, तेव्हा उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. निमित्त होते अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भैरवनाथ विद्यालय (पळवे खुर्द) येथील सन १९९१-९२ च्या बॅचच्या स्नेहसंमेलनाचे. तब्बल ३५ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर हे मित्र-मैत्रिणी पुन्हा एकदा एकत्र आले आणि क्षणभरासाठी काळ मागे सरकला.

​३५ वर्षांचा वनवास संपला, मैत्रीचा ‘विजय असो…!’ भैरवनाथ विद्यालयाचा विजय असो…. असा निनाद घुमला!

अंगावर सफेद- खाकी युनिफॉर्म नसला तरी प्रत्येकाच्या उरात तेच बालपण आणि तीच निरागसता होती. पापाभाई शेख (फैजल पठाण) यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या जिवलग मित्रांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून हा ‘गेट-टुगेदर’चा प्रवास आकाराला आला. तब्बल ९६ पैकी ८९ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात या टीमला यश आले. या सोहळ्यासाठी जुन्या गुरुजनांची उपस्थिती हे विशेष आकर्षण ठरले. धोंडीबा पुजारी सर, राजेंद्र गोरे सर, पोपट जाधव सर, थोरात सर, साळवे सर, शेळके सर व शिक्षकेतर कर्मचारी तुकाराम पवार यांचे पारंपारिक वाद्याच्या गजरात, औक्षण करीत ,फेटे बांधून आणि फुलांच्या उधळणीत जंगी स्वागत करण्यात आले.

​घंटा वाजली आणि शाळा पुन्हा भरली!

कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी दादाभाऊ तरटे यांनी हातात घेत त्यांना तोलामोलाची साथ देण्यासाठी सुनील वाबळे, गोरख गाडीलकर, संजय गादिया बारगळ संतोष, मच्छिंद्र देशमुख, जयश्री देशमुख, कृष्णा सातपुते, साधना पळसकर, स्वाती पोटघन, मालती पोटघन व इतर सहकाऱ्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सहकार्य केले.
या कार्यक्रमासाठी सुरत ,मुंबई, पुणे, अहिल्यानगर इत्यादी ठिकाणावरून विद्यार्थी वेळेवर उपस्थित राहिले .
कार्यक्रमाची सुरुवात माजी विद्यार्थी बबनराव वाबळे यांनी शाळेची घंटा वाजवून केली. पुजारी सरांच्या अध्यक्षतेखाली दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि दिवंगत मुख्याध्यापक खोडदे सर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. प्रार्थनेवेळी सर्वजण इतके तल्लीन झाले होते की, ३५ वर्षांचे अंतर क्षणार्धात पुसले गेले.

​’संपत्तीपेक्षा संतती’चा परिचय ठरला लक्षवेधी
प्रास्ताविक विश्वनाथ तरटे यांनी केले. परिचयाच्या सत्रात केवळ पद आणि पैसा न सांगता, आपल्या आयुष्याची जडणघडण आणि संस्कारांचा ‘संतती’च्या रूपाने उल्लेख करण्यावर भर देण्यात आला. अनेक मित्रांनी मंचावर आयुष्यातील चढ-उतार सांगताना गहिवरून आले, तर अनेकांनी आयुष्यात पहिल्यांदाच माईक हातात धरून आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

​पिंगळ्याच्या वेशभूषेत पापाभाईंनी जिंकली मने!
कार्यक्रमाचा सर्वात मोठा ‘सरप्राईज’ ठरला तो म्हणजे पिंगळ्याचे सादरीकरण! ज्याने या कार्यक्रमासाठी अहोरात्र कष्ट घेतले, त्या पापाभाई शेख यांनी पिंगळ्याच्या वेशभूषेत ग्रामीण ढंगात प्रवेश केला, तेव्हा कोणालाही त्यांना ओळखणे शक्य झाले नाही. त्यांच्या सादरीकरणाने आणि भविष्याच्या डायलॉगनी शिक्षकांसह सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. त्यांच्या या कलेचे सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

​जेवणाच्या पंगती आणि ‘निरगुडीची छडी’
दुपारच्या भोजना नंतर काही मित्र गप्पांच्या ओघात वर्गात (हॉलमध्ये) यायला उशीर झाले. त्यावेळी थोरात सरांनी आपल्या चाणक्ष नजरेने त्यांना हेरले आणि पुन्हा एकदा ३५ वर्षांपूर्वीच्या आठवणीत नेण्यासाठी ‘छडी’ने शिक्षा केली. हा गमतीशीर क्षण सर्वांच्या मनाला भावला.

​निरोप घेताना पाणावलेले डोळे
कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक विद्यार्थ्याला एक सुबक ट्रॉफी स्मृतीचिन्ह म्हणून देण्यात आली. संजय गादिया यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने सांगता झाली, तरीही कोणाची पावले बाहेर पडायला तयार नव्हती. जड अंतकरणाने निरोप घेताना प्रत्येक जण एकच विचारत होता— “पुन्हा भेटू ना यार…!”

​[“आम्ही आमच्यासाठी एक दिवस जगलो!”
“हे स्नेहसंमेलन केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर ती एक जगण्याची ऊर्जा होती. ३५ वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले, काही मित्र आणि शिक्षक आपल्याला सोडून गेले, पण त्यांच्या आठवणींसह आम्ही पुन्हा एकदा तेच जुने दिवस अनुभवले.” आशा भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.]

 

यावेळी शिक्षकांना “भक्ती शक्तीची व विठ्ठल रुक्मिणीची ” मूर्ती देण्यात आली, काही मनोरंजनात्मक कार्यक्रमात ” स्वर्गात आकाशगंगा ” या गाण्यावर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी व शिक्षकांनी ठेका धरत तसेच महिलांनी काही खेळ खेळत कार्यक्रमाचा आनंद लुटला.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 7 1 7 2 5
Users Today : 5
Users Yesterday : 47