पुणे प्रतिनिधी:सागर पवार
महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक संजय ऐलवाड यांच्या झिब्राच्या कथा या पुस्तकाला बाल कथा विभागात कोल्हापूर येथील मराठी बालकुमार साहित्य सभेचा उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत पाटील यांनी नुकतेच संपर्क करून कळवले असल्याचे ऐलवाड यांनी सांगितले. रोख रक्कम, मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कोल्हापूर येथील मराठी बालकुमार साहित्य सभेचे 2025 या वर्षाचे साहित्य पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. यात बाल कथा विभागात संजय ऐलवाड यांच्या झिब्राच्या कथा या पुस्तकाला उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत पाटील आणि उपाध्यक्ष परसराम आंबी यांनी कळविले आहे.
झिब्राच्या कथा हा बालकथा संग्रह असून ‘झिब्रा’ हे बाल साहित्यातील पात्र आहे. आजपर्यंत बाल साहित्यात नायक झाले आहेत. मात्र नायिका दुर्मिळ आहेत. ऐलवाड विकसित करत असलेली नायिका आहे. यात ऐलवाड यांनी एकूण 9 कथा समाविष्ट केलेल्या आहेत. सर्वच कथा वाचनीय असून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. प्रसिद्ध बालसाहित्यिक, साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार विजेते लेखक ल.म. कडू यांनी या पुस्तकाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिली आहे. याशिवाय शिरूर तालुक्यातीलजिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळा वाबळेवाडी, हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगतापवाडी तर मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताथवडे या शाळांतील विद्यार्थ्यांनी या पुस्तकातील कथांचे वाचन केले आहे. लेखक सचिन बेंडभर, प्रा. कुंडलिक कदम, रवींद्र जवादे या नव्या पिढीतील लेखकांबरोबर प्रा.साईनाथ पाचारणे, जेष्ठ लेखक सूर्यकांत सराफ, एकनाथ आव्हाड, आबा महाजन, गणेश भाकरे, डॉ. श्रीकांत पाटील, प्रा. देवबा पाटील, प्रा. रामदास केदार, सुनिताराजे पवार, विनोद सिनकर, डॉ. विशाल तायडे, तुषार बोडके, कल्पना मलये, आणि उत्तम सदाकाळ यांनी या पुस्तकाचे समीक्षण केले आहे.
ऐलवाड यांच्या झिब्राच्या कथा या कथासंग्रहाला हा चौथा पुरस्कार असून या पुरस्काराबद्दल साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






Users Today : 9
Users Yesterday : 13