शिरूर प्रतिनिधी:
बालमनाच्या अपेक्षांची अचूक जाणीव असणारे साहित्य क्षेत्रातील एक उमदे व्यक्तिमत्व म्हणजे सचिन बेंडभर. आपल्या जादुई लेखणीने ते मोठ्यांबरोबर बालवाचकांमध्येही तितकेच प्रसिद्ध आहेत. साहित्याच्या हरेक क्षेत्रात ते एखाद्या अष्टपैलू खेळाडूप्रमाणे लीलया वावरत असतात आणि आपल्या लेखनशैलीचा ठसा उमटवत असतात. त्यांच्या या बोधवर्धक, ज्ञानवर्धक व मनोरंजक लेखनामुळे महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक मंडळांने त्यांच्या कवितेचा सहावीच्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमातदेखील समावेश केला आहे.
अनेक पुरस्कारांना गवसणी घालणारा हा तरुण साहित्यिक आपल्या साहित्यातून समाज जीवनाचे यथार्थ दर्शन घडविताना, कष्टलेल्या मनांना प्रफुल्लीत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. नर्मविनोदी कथांमधून खळखळून हसवताना कथाकार सचिन बेंडभर आपल्या सामाजिक कथांमधून मात्र वाचकांच्या काळजाला हळूच हात घालून डोळ्यात अश्रू उभे करताना दिसतात. शेतीमातीच्या कवितेतून बळीराजाचे भीषण वास्तव मांडताना कवी सचिन बेंडभर भविष्याची उपायात्मक वाटचाल देखील सुचवतात. त्यांच्या या हरहुन्नरी लेखणीमुळे ते साहित्य विश्वात कमालीचे यशस्वी झालेले आहेत.
अशा या शैलीदार बालसाहित्यिकाचा ‘हत्तीची सहल’ हा बालकविता संग्रह नुकताच माझ्या हाती पडला आणि माझे मन एखाद्या फुलपाखराप्रमाणे नकळत त्याच्याकडे आकर्षित झाले. सचिन बेंडभर यांचा हा सर्वांग सुंदर बालकविता संग्रह सर्वार्थाने नितांत सुंदर झालेला आहे. या बालकविता संग्रहाचे मुखपृष्ठच कमालीचे बोलके आहे. पाहताक्षणी ते आपले मन मोहून घेते.
मुखपृष्ठावरील हत्तीच्या फजितीने आपल्या चेहऱ्यावर आपसूक हास्य फुलते. चित्रकार प्रतीक काटे यांच्या कुंचल्याने हत्तीची फजिती बरोबर चित्रित केली आहे. आपल्या फजितीने हसणाऱ्या हत्ती, त्याची गंमत बघून खिदळणारे अस्वल आणि माकड, झाडाआडून ही मजा न्याहाळणारी दोन मुले आपल्याला पुस्तकातील गमतीची कल्पना देऊन जातात.
सोनेरी वर्खाची आठवण करून देणारे कवितासंग्रहाचे शीर्षक अतिशय वळणदार आणि कलात्मक आहे. सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे डोळ्यांना समाधान आणि मनात गारवा पेरणारी चित्रातील रंगसंगती मुखपृष्ठाचे देखणेपण वृद्धिंगत करते.
संस्कृती प्रकाशन पुणे यांनी हा दर्जेदार बालकविता संग्रह प्रकाशित केला आहे. प्रकाशिका सुनीताराजे पवार यांनी हा कवितासंग्रह वाचकांसमोर आणताना गुणवत्तेकडे विशेष लक्ष पुरवले आहे. त्यामुळे ‘हत्तीची सहल’ नक्कीच सर्वगुणसंपन्न झाली आहे. आर्ट पेपरवरील सुंदर छपाई, कवितांसाठी प्रतीक काटे यांनी रेखाटलेली रंगवेल्हाळ चित्रे अगदी दुग्धशर्करा योगाप्रमाणे जुळून आल्याने बालवाचकांसाठी हा बालकविता संग्रह पर्वणी ठरेल यात शंका नाही.

६० पानांच्या या कवितासंग्रहात एकूण ४९कविता आहेत. बालदिनाचे औचित्य साधून प्रकाशित झालेला हा बालकवितासंग्रह बालमनांमध्ये आनंद पेरणारा आहे.
कविता संग्रहातील पहिलीच कविता ‘हत्तीची सहल’ ही शीर्षक कविता आहे. या कवितेतून जंगलातील प्राण्यांची निघालेली सहल आणि त्या सहलीत झोपाळा मोडून हत्तीची झालेली फजिती, कवी सचिन बेंडभर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने रेखाटली आहे. ते कवितेतील एका कडव्यात म्हणतात,
हत्तीदादा बसताच
झोपाळा मोडला
अगडबंब देह मग
जमिनीवर पडला
फजिती झाल्याने वैतागलेला हत्तीदादा आपल्या जंगलाचे गुणगाण करताना म्हणतो,
हत्तीदादा म्हणाले,
इथे काहीच नाही खरे
या सगळ्यांपेक्षा
आपले जंगलच बरे !
‘आजी’ या कवितेत कवी सचिन बेंडभर आजीच्या नात्याचे महत्त्व अधोरेखित करत, आजीच्या मायेची रुजवण बालमनात करताना म्हणतात,
आलेली बस निरखून बघते
थांबली नाही तर होते उदास
थंडी वारा असो कितीही
ती बघते वाट तासनतास
‘बाळकृष्ण’ ही कविता तर बघताक्षणी आपलीसी होते. या कवितेचे चित्रच खूप मनभावन आहे. चित्राकडे बघता बघता कवीचे शब्द हळुवारपणे आपल्या मनात प्रवेश करतात आणि बालवाचक आपसूकच बाळकृष्ण होऊन जातो.
थेंब थेंब पाऊस
साचले तळे
अंगणात माझ्या
बाळकृष्ण खेळे
कविता वाचताना नकळतपणे आपण भूतकाळात हरवून जातो आणि बालपणीच्या चिखल, पाण्यातल्या आठवणी अंगावर घेत आपण मनामध्ये गुणगुणत म्हणतो,
चिखल चिखल
अंगणात राडा
खेळताना करतो
काठीचा घोडा
‘वाढदिवस’ ही कविता अशीच गमतीदार आहे. कवी सचिन बेंडभर यांनी चक्क वाघोबाच्या मुलाचा वाढदिवस या कवितेमध्ये साजरा केलाय. या कवितेतील गाढवाचे गायन ही कल्पनाच खुदकन हसायला लावणारी आहे. कवितेतील गाढवाचे चित्रसुद्धा असेच विलक्षण आहे. गाढव हसता हसता गाते हे बघताक्षणी लक्षात येऊन आपण कधी त्या वाढदिवसाच्या सोहळ्यात सामील होतो हे आपले आपल्यालाच कळत नाही.
गाढवाचे सुरू झाले
सुस्वर गायन
गाणे ऐकून हरणाने
केले पलायन
या ओळी वाचताना गाढवाचा सुर कसा टिपेला पोहोचला असेल याची कल्पना करत आपणसुद्धा खुदुखुदु हसू लागतो.
‘पहाट’ या कवितेत कवी पहाटेचे वर्णन करताना म्हणतात,
लोपला काळोख
पूर्व लाल झाली
वारा गुज सांगे
दारी उषा आली
उगवणारा सूर्य नवीन आशेचे किरण घेऊन येतो. नव्या जीवनाची सुरुवात करण्याचा मंत्र आपल्याला देतो. हे बालवाचकांना सांगताना कवी म्हणतात,
उठा झडकरी
वेळ पहाटेची
सुरुवात करू
नव्या जीवनाची
अशा प्रकारे या कवितेतून कवी आशेचे व संपन्न भविष्यकाळाचे चित्र बालमनासमोर उभे करतात.
या कवितासंग्रहांमध्ये विविध विषयावरील कविता आहेत. साध्या सोप्या विषयावरील कविता आहेत. त्यामध्ये पशुपक्ष्यांच्या कविता, नात्यांचे महत्त्व टिपणाऱ्या कविता, निसर्गाचे सौंदर्य उलगडून दाखविणाऱ्या कविता, ज्ञानवर्धक कविता, गमतीजमतीच्या कविता आहेत.
या सगळ्याच कविता बालवाचकांना नक्कीच आवडतील. एकदा का ‘हत्तीची सहल’ आपण हातात घेतले की, ही सहल पूर्ण झाल्याशिवाय आपण बालकविता संग्रह बाजूला ठेवणार नाही याची मला खात्री आहे. या कवितासंग्रहातील बालसुलभ गमती जमती वाचण्यासाठी आपण ‘हत्तीची सहल’ एकदा नक्की वाचली पाहिजे.
विशेष म्हणजे या कवितासंग्रहाला साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे यांची प्रस्तावना आहे. अशा दिग्गज साहित्यिकांनी ‘हत्तीची सहल’ या बालकविता संग्रहाला कौतुकाची थाप दिल्याने आपल्याला कवितासंग्रहाच्या दर्जेदारपणाची कल्पना येते.
कविता संग्रहाच्या मलपृष्ठावरील पाठराखण प्रसिद्ध बालसाहित्यिक साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्राप्त कवी एकनाथ आव्हाड यांनी केली आहे. साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या दोन दिग्गज साहित्यिकांच्या या पाठबळामुळे आणि शब्द कौतुकामुळे हा कवितासंग्रह एक वेगळीच उंची गाठतो. पुढील काळात ‘हत्तीची सहल’ साहित्य अकादमी पुरस्कारापर्यंत जाऊन पोहोचेल असा मला आत्मविश्वास आहे.
बालवाचकांसाठी अशी सुंदर कलाकृती दिल्याबद्दल कवी सचिन बेंडभर यांचे मनापासून धन्यवाद !!!
त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा !






Users Today : 6
Users Yesterday : 7