शिरूर प्रतिनिधी : दीपावली सणाच्या मंगलमय पर्वाला सुरुवात होत असताना *वसुबारस या गोवत्स द्वादशीच्या शुभमुहूर्तावर* गुरुवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी *विश्व हिंदू परिषद बजरंग दल* यांच्या वतीने शिरूर शहरात विविध ठिकाणी भव्य गोमाता पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला नागरिकांचा, विशेषतः महिलावर्गाचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

भारत सरकारने गोमातेला ‘ *राज्यमाता* ‘ हा सन्मान जाहीर केल्याच्या निर्णयाचा आदर व सन्मान व्यक्त करण्याच्या उद्देशाने गोमाता पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्त्व अधोरेखित करणे तसेच गोसेवा व गोसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
या उपक्रमाची सुरुवात सकाळी शिरूर नगर परिषद नवीन इमारतीच्या प्रांगणात नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्या हस्ते गोमाता पूजनाने करण्यात आली.
यावेळी सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच नगर परिषद अधिकारी व कर्मचारी वृंद,सर्व बजरंग दल कार्यकर्ते,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वांच्या उपस्थितीत विधिवत गोपूजन करून गोमातेप्रती आदरभाव व्यक्त करण्यात आला.
जय श्रीराम ,गोमाता की जय,जन्म जन्म का नाता हे गाय हमारी माता हे. या घोषणा नी संपूर्ण परिसर दुम दुमून गेला
यानंतर शिरूर शहरातील अखिल राम आळी मित्र मंडळ राम आळी , सुवर्ण युग मित्र मंडळ ,हुडको कॉलनी, संभाजीनगर मित्र मंडळ, रामलिंग रोड, लक्ष्मी माता मंदिर तहसील कार्यालय , स्टेट बँक कॉलनी तसेच बाबुराव नगर, अजिंक्य तारा मित्र मंडळ या विविध भागांमध्ये 10 ते 12 ठिकाणी *वसुबारस निमित्त गोमाता पूजन सोहळे* उत्साहात पार पडले.
या सर्व ठिकाणी महिलावर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिभावाने गोमातेचे पूजन केले. संपूर्ण शहरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
वसुबारस हा सण भारतीय संस्कृतीत गोमातेप्रती कृतज्ञता, श्रद्धा आणि सेवाभाव व्यक्त करण्याचा दिवस आहे. या निमित्ताने शिरूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या गोमाता पूजन सोहळ्याच्या माध्यमातून गोमातेचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित झाले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
विश्व हिंदू परिषद बजरंग दल, शिरूर यांच्या वतीने सहभागी सर्व हिंदू बांधवाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.




Users Today : 58
Users Yesterday : 30