सरदवाडी प्रतिनिधी: दतात्रय कर्डीले
स्टेट इनोव्हेशन ॲन्ड रिसर्च फाऊंडेशन महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धेत वाबळेवाडी शाळेतील साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांच्या वाबळेवाडी शाळेचा परीसस्पर्श या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे .
त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सारथी शिष्यवृत्ती प्रमुख अशोक काकडे यांच्या शुभहस्ते व प्रसिद्ध साहित्यिक संजय जगताप, सकाळचे सोलापूर जिल्ह्यातील संपादक अभय दिवाणजी, योगेश सोनवणे, बालभारतीचे सदस्य अजयकुमार लोळगे, लातूरच्या कलेक्टर वर्षा ठाकूर, सर फाउंडेशनचे संयोजक बाळासाहेब वाघ, सिद्धाराम माशेळे आणि राजकिरण चव्हाण आदींच्या उपस्थितीत देण्यात आला.
या नवोपक्रमाची सर फाउंडेशनकडून राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे.
राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये, यासाठी नवनवीन उपक्रम, तसेच कल्पनांचा वापर करत आहेत.
तसेच प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक व अधिकारी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्हावी, तसेच सर्व स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धा स्टेट इनोव्हेशन ॲन्ड रिसर्च फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्यामार्फत आयोजित केली जाते.
या वर्षीच्या नवोपक्रम स्पर्धा मधील निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत वाबळेवाडी शाळेतील साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांच्या वाबळेवाडी शाळेचा परीसस्पर्श या नवोपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर नामांकन मिळाले असून त्यांना मिळालेल्या या उत्तुंग यशासाठी साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
