शिरूर प्रतिनिधी -सुदर्शन दरेकर
राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी मंगळवार, 26 मे रोजी पदभार स्वीकारताच राज्यभरात धडक कारवायांना सुरुवात झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत मुंढे यांनी प्रशासनात आक्रमक भूमिका घेतली असून पहिल्याच दोन दिवसांत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे.

निमगाव केतकी येथे रसायनयुक्त आंबे जप्त:
पुणे जिल्ह्यातील निमगाव केतकी येथे आंबे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी रसायनांचा वापर केल्याची माहिती FDA अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर तातडीने छापा टाकण्यात आला. या कारवाईत सुमारे 800 किलो आंबे जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत अंदाजे 20 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
फळे लवकर पिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घातक रसायनांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये निकृष्ट तूप जप्त
याच दिवशी छत्रपती संभाजीनगर येथेही FDAने कारवाई करत तब्बल 40 हजार 160 रुपये किंमतीचे निकृष्ट दर्जाचे गायीचे तूप जप्त केले. संबंधित नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून दोषींवर पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यात 234 किलो निकृष्ट पदार्थ जप्त:
बुधवार, 27 मे रोजी येरमाळा येथे FDAच्या पथकाने आणखी एक मोठी कारवाई केली. या ठिकाणी 47 हजार 300 रुपये किंमतीचा सुमारे 234 किलो निकृष्ट दर्जाचा खाद्यसाठा जप्त करण्यात आला. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
“नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड नाही”
पदभार स्वीकारल्यानंतरच तुकाराम मुंढे यांनी राज्यभरातील अन्न सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल, कृत्रिमरीत्या पिकवलेली फळे तसेच बनावट औषधांवर मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

प्रशासकीय कामकाजातील शिस्त, धडक निर्णय आणि कठोर अंमलबजावणीसाठी ओळखले जाणारे मुंढे FDAमध्ये रुजू झाल्यानंतर विभाग अधिक सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यभरातील अन्न व्यावसायिक, व्यापारी आणि उत्पादकांमध्ये या कारवायांमुळे खळबळ उडाली असून पुढील काळात आणखी मोठ्या कारवायांची शक्यता व्यक्त केली जात आहे.





Users Today : 101
Users Yesterday : 41