शिरूर प्रतिनिधी :
सकारात्मकता हा पिंडच असावा लागतो. स्वप्नाळू , निष्पाप, कृतिशील मनाच्या व्यक्ती हा पिंड बाळगू शकतात, असं मला वाटतं. आजूबाजूला इतकं नकारात्मक दिसत असताना हिरवीगार आशेची वेल मुद्दाम जोपासावी लागते. ‘ जगणं होईल हिरवंगार ‘ हा कवितासंग्रह वाचून आपण आशेची बी नकळत मनात रुजवू लागतो. वाचून हातावेगळं केलं,तरी मनात हे रुजणं आकार घेऊ लागतं.
मुळात एकनाथजी आव्हाड बालसाहित्यकार. बाल किंवा कुमारवयात मनाने प्रवेश केल्याखेरीज बालसाहित्य घडत नाही. आव्हाडांची बाल साहित्यामध्ये उदंड साहित्यसंपदा पाहून आपण समजू शकतो की, ते सतत एक सरळ, निष्कपट भाव घेऊन जगत आहेत. तोच त्यांचा स्थायीभाव आहे. मा. मधु मंगेश कर्णिक ह्यांना प. पू.साने गुरुजी यांची आठवण झाली ते उगीच नाही !
आव्हाड यांची कविता क्लिष्ट किंवा संदिग्ध नाही. सोपी आणि सहजसुंदर आहे. प्रांजळ आहे. साधी पण लोभस रानफुले असावीत, तशी आपण एकेक कविता न्याहाळत पुढे सरकतो. हातात घेतल्या घेतल्याच वाचून पुस्तक संपते. आणि ‘हे काय संपले सुद्धा ?’ असे वाटून जाते !
बऱ्याचदा आपण बघतो संकट किंवा अडचणींनी घेरलेली माणसे आक्रमक होतात किंवा हताश होतात, खचून जातात. अशा वेळी स्थिर राहून सकारात्मक होणे गरजेचे असते. ती सकारात्मकता ही कविता देते. कितीही हताश मन असले तरी वाऱ्याची झुळूक म्हणजे प्रसन्नता आणणारी मंद झाक असते ना, तशीच ही कविता आपल्याला सुखावते.

‘सविता पटेकर सतत गैरहजर ‘ह्या कवितेत आशावाद सक्रिय होतो.
त्यासाठी कनवाळू ,परोपकारी मन हवे. अशिक्षित किंवा सुशिक्षित असणे इथे गौण आहे. मनाची प्रगल्भता मात्र हवी. ही प्रगल्भता कवीच्या आईला लाभलेली दैवी देणगी आहे. त्यांची आई ह्या कनवाळू असण्याचा स्रोत आहे. त्यांचे वडील सुभाषित बोलावं तसं तसं साध्या परंतु परिणामकारक शब्दात बोलतात .म्हणजे अनुवंशिक आणि संस्कारजन्य असे दोन्ही त्यांना त्यांच्या भाग्याने मिळाले असे मी म्हणेन.
‘हरवलेला संवाद ‘ ह्या कवितेत जगाशी बोलायला धावताना आधी स्वता:शी बोल, आतला आवाज ऐक असं सांगणारी आई त्यांना आठवते. हा सल्ला देणारं साधन बाजारात उपलब्ध नाही,ह्याची जाणीव आईच्या मायेने ते करून देतात. आईची सोबत, तिचे अस्तित्व वाचक म्हणून आपणदेखील अनुभवतो.

पुस्तक सुद्धा त्यांना आई वाटते !
श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यातला फरक जिवाचा जिव्हाळा ह्या कवितेत मला आकळला. ‘चिरफळलेल्या तळव्यांना वेदनेचा अंश नाही ‘ असं कवी लिहून जातो. तेव्हा ‘थकलेल्या पावलांना ज्या विठूची आस असते तो विठू कवीला केवळ करुणेचा सागर आहे असे सांगायचे नाही. तो माणसाच्या हृदयातल्या करूणेला जागवतो आहे.
ह्याच वृत्तीमुळे ‘अनुपम भेट ‘ ह्या कवितेत ‘वैष्णवांचामेळा जेव्हा एकमेकांची गळाभेट घेतो तेव्हा त्यांच्या मुखातून कुणी वेगळाच बोलतो’ अशी भावना एकनाथजी व्यक्त करतात. ‘तो न सांगता देऊन जातो’ आपल्याला असंही ते बजावतात. ‘काही न केल्यासारखा हा ढिम्म उभा विठू ‘अंतस्थ प्रेरणा देतो. हृदयातल्या करुणेला जागवतो. श्रद्धेचे किती साजरे गोजिरे रूप हे.
अमंगल किंवा नकारात्मक भावना निपटून काढण्याचे सामर्थ्य अशा शब्दांमध्ये असते.
राहून राहून मनात येत आहे की, समाजात क्षुल्लक कारणावरून हिंसाचार किंवा स्वतःला संपवण्याच्या घटना घडत आहेत ह्यासाठी एकनाथजी ह्यांनी लिहावे. समाज मन देखील अशा घटना ऐकून दगड झाले आहे की काय असे वाटू लागते. एकनाथजी कोमल,हळुवार शब्द वापरून अशा दगड झालेल्या मनातून कोरीव मूर्ती घडवतील अशी आशा वाटते. समाजाची गरज आणि त्यांच्या शब्दांची ताकद दोन्ही गोष्टी मला ही अपेक्षा करायला भाग पाडत आहेत .
जगाने व्हावं हिरवंगार! असे त्याचे नाव असेल .
[पुस्तकाचे नाव : जगणं होईल हिरवंगार
कवी : एकनाथ आव्हाड
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
पृष्ठे : १००, किंमत : १६०/- रुपये
समीक्षक : वसुंधरा घाणेकर.
संपर्क 88799 78980]





Users Today : 3
Users Yesterday : 38