शिरूर प्रतिनिधी : सुदर्शन दरेकर
मुंबई, पुणे, मराठवाडा आणि अहिल्यानगर या महत्त्वाच्या भागांना अधिक वेगवान, सक्षम आणि आधुनिक जोडणी देणाऱ्या नेरळ–वांद्रे–पाईट–शिरोली–पाबळ–मळठण–शिरूर या १३४ कि.मी. लांबीच्या चौपदरी महामार्ग प्रकल्पाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. राज्याच्या दळणवळण आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, भविष्यात तो “गेमचेंजर” ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

सध्या पुणे–शिरूर मार्गावर वाढत्या वाहनसंख्येमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. नवीन महामार्गामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असून मुंबई व जेएनपीटी बंदराशी थेट आणि जलद संपर्क निर्माण होणार आहे. परिणामी मालवाहतूक, उद्योग आणि व्यापाराला मोठा वेग मिळणार आहे.
या महामार्गामुळे रायगड, पुणे, मराठवाडा आणि अहिल्यानगर परिसरातील आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे. विशेषतः खेड एसीझेड, तळेगाव, चाकण, रांजणगाव आणि सुपा औद्योगिक क्षेत्रांना या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. तसेच खेड, शिरूर, आंबेगाव आणि मावळ परिसरातील विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
उद्योग, रोजगार आणि गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण करणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ग्रामीण आणि शहरी भागांमधील अंतर कमी करत विकासाचा नवा महामार्ग ठरणार आहे.

दरम्यान, या प्रकल्पासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी विशेष पाठपुरावा करून सातत्यपूर्ण प्रयत्न केले होते. राज्याच्या सर्वांगीण विकासाचे त्यांनी पाहिलेले स्वप्न पुढे नेत हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.





Users Today : 111
Users Yesterday : 215