शिरूर प्रतिनिधी: सुदर्शन दरेकर
अखिल भारतीय किसान सभेच्या पुणे जिल्हा शाखेचे १०वे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन येत्या ९ मे रोजी शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन दिवसभर चालणार असून, जिल्ह्यातील विविध शेतकरी प्रश्नांवर यावेळी सखोल चर्चा होणार आहे.

गेल्या काही वर्षांत किसान सभेने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती, शेतमालाला योग्य दर, पीक विमा, सिंचन, वीज तसेच वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी विविध स्तरावर आंदोलन व पाठपुरावा केला आहे. विशेषतः हिरडा पिकाच्या नुकसानभरपाईसाठी केलेल्या लढ्यामुळे शेतकऱ्यांना मोठा निधी मिळवून देण्यात यश आले आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन कॉ. उमेश देशमुख (अध्यक्ष, किसान सभा – महाराष्ट्र) यांच्या हस्ते होणार असून, समारोप कॉ. अजित नवले (सरचिटणीस, किसान सभा – महाराष्ट्र) यांच्या उपस्थितीत होईल.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कामगार नेते कॉ. अजित अभ्यंकर, माकपा पुणे जिल्हा सचिव कॉ. गणेश दराडे तसेच सामाजिक कार्यकर्ते रविंद्र धनक उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.





Users Today : 11
Users Yesterday : 119