भाषेच्या मुद्द्यावरून भविष्यात अधिकारी वर्गात भाषिक भेद निर्माण होईल : दत्तात्रय वारे गुरुजी

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:

शिरूर येथे सजग, सुजाण पालकत्वासाठी मराठीप्रेमी पालक महासंमेलनास सुरुवात
शिरूर (पुणे) : मराठी शाळा टिकण्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण फक्त शहरी किंवा इंग्रजी भाषेच्या शाळांमध्येच दिले जाते ही समजूत चुकीची आहे. जात-पात-धर्म भेदाप्रमाणेच सरकारी मराठी आणि खासगी इंग्रजी शाळांमध्ये शिकून सरकारी पदांवर पोहोचलेल्यांमध्ये भविष्यात भाषिक भेद निर्माण होईल, असा इशारा जिल्हा परिषदेच्या जालिंदरनगर शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांनी दिला. मराठी मातेचे दूध प्यायलेल्या प्रत्येकाने एकत्र येऊन मराठी भाषा टिकविण्यासाठी युद्ध पातळीवर कार्य करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मराठी अभ्यास केंद्र, कृषी लोकविकास संशोधन संस्था, शिरूर आणि शिरूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सजग आणि सुजाण पालकत्वासाठी दोन दिवसीय मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले ,असून महासंमेलनाचे उद्‌घाटन आज (दि. १०) वारे गुरुजी यांच्या हस्ते झाले.

त्या वेळी ते बोलत होते. शिरूर येथील जीवन विकास मंदिर, कुकडी वसाहत येथे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे यंदाचे ९वे वर्ष आहे. संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी होणार आहे.

मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार, अभिनेत्री तसेच मराठी शाळांच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमित, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, शिरूरच्या नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आणि प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार निकम, मुख्याध्यापक महासंघाचे नंदकुमार सागर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, ॲड. सुभाष पवार, राहुल पाचर्णे, नगरसेविका स्वप्नाली जामदार, डॉ. सुनिता पोटे, स्वाती साठे, सागर नरवडे, आनंद भुजबळ यांची उपस्थिती होती. कृषी लोकविकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक अध्यक्षस्थानी होते.
इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढत असताना समाजात सावध पालकत्व आवश्यक आहे, असे आग्रही मत नोंदवून दत्तात्रय वारे गुरुजी म्हणाले, कुठल्याही भावनेच्या आहारी जाऊन विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेकडे वळविणे हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. हा निर्णय घेताना कुठल्या अभ्यास अथवा सर्वेक्षणाच्या आधारे घेतला जात आहे .

याविषयी विचार होणे गरजेचे आहे. शालेय प्रवेश काळात मराठी शाळांना बदनाम करत वातावरण दुषित करण्याच्या काळात इंग्रजी शाळेचा प्रभाव कमी करत आपल्या पाल्यांना मराठी शाळेकडे वळविणे हे सजग पालकांचे कर्तव्य असून आपल्या मुलांची आणि गावाची चिंता आपणच करणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामस्थ आणि लोकसहभाग हे महत्वाचे दुवे ठरणार आहेत.

संमेलनाची भूमिका मांडताना डॉ. दीपक पवार म्हणाले, मराठी शाळांविषयी समाजमनात बदल घडावा, पालकांना, समाजाला मराठी भाषेविषयी प्रेम निर्माण व्हावे आणि मराठी माध्यमातील शाळांचे चुकीचे चित्र समाजातून दूर करावे यासाठी या संमेलानाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा व शाळा टिकाव्यात तसेच समाज, राजकीय सत्ता आणि प्रशासन खडबडून जागे व्हावे, इंग्रजी माध्यम व मराठी माध्यम अशी नवीन वर्णव्यवस्था निर्माण होऊ नये, मराठी पालकांचे एकत्रिकरण व्हावे, महराष्ट्र धर्म टिकावा, समाज भाषिक गुन्हेगार होऊ नये हीच या संमेलनामागील भूमिका आहे.
मराठी शाळा, मराठी शिक्षक हे फक्त विद्यार्थी नव्हे तर पिढी घडवत असतात, असे सांगून चिन्मयी सुमित यांनी संमेलनास शुभेच्छा दिल्या.
प्राजक्ता हनमघर म्हणाल्या, आजच्या शिक्षण व्यवस्थेत मुलांच्या मनाचा विचार न करता वेगावर भर दिला जात आहे. आज मुले नव्हे तर लहान लहान बाळे शाळेत जात आहेत ही सत्य परिस्थिती आहे. प्राथमिक स्तरापासून मातृ भाषेत शिक्षण न घेतल्यास वेगळी भाषा, संस्कृती आत्मसात करून शिक्षण घेताना मुलांवर ताण येऊ शकतो. शिक्षणाचे बाजारीकरण झालेल्या परिस्थितीत संकल्पना समजावून सांगण्यापेक्षा पाठांतराव भर देत फक्त उत्तरे लिहायला शिकविणे म्हणजे ज्ञान देणे नाही, हे पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे. मातृभाषेचा पाया पक्का केला तर मुल बहुभाषिक होऊ शकते.


अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रवींद्र धनक म्हणाले, आज बहुजन बेसावध आहेत, शिक्षण क्षेत्रात ज्ञान निर्मितीची आवश्यकता आहे. शिक्षण क्षेत्राचे खासगीकरण न होऊ देता ते समाजाच्या मालकीचे व्हावे यासाठी प्रत्येकाने आपआपल्या पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिक्षकांबद्दल आत्मियता आणि आदरभाव असणारी संस्कृती पुन्हा निर्माण करावी लागणार आहे.
ऐश्वर्या पाचर्णे, नंदकुमार सागर, नंदकुमार निकम यांनी मराठी शाळा आणि मराठी भाषा टिकण्यासाठी भविष्यातही विविध उपक्रम राबविले जातील, अशी ग्वाही दिली.

मान्यवरांचे स्वागत गंगाधर तोडमल, स्वाती थोरात, डॉ. वैशाली साखरे, डॉ. दीपक गायकवाड, अर्जुन रासकर, सविता बोरवडे, पटेल मोहंमद हुसेन, दिपाली शिंदे, प्रीती बनसोडे आणि रवींद्र धनक यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद भंडारे यांनी केले तर आभार डॉ. सुनिता पोटे यांनी मानले. जीवन विकास मंदिर शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले.
सुरुवातीस मराठी शाळा जागर फेरी काढण्यात आली. यात जीवन विकास मंदिर (प्राथमिक-माध्यमिक विभाग), नगरपालिकेच्या शाळा क्रमांक एक, चार, पाच, सहा, सात तसेच विद्याधाम प्रशाला (प्राथमिक-माध्यमिक विभाग), कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय (कुरुंद), प्राथमिक-माध्यमिक आश्रम शाळा (कुरुंद), अध्यापक महाविद्यालय (कुरुंद), शिवाजी विद्यालय (गोलेगाव), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (गोलेगाव), न्यू इंग्लिश स्कूल (शिरूर) यांचा सहभाग होता. दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा जागर करत मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले. शाळेच्या आवारात भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 7 1 7 1
Users Today : 6
Users Yesterday : 7