[“ध्वजारोहण करण्याचा मान माझ्यासारख्या सामान्य तरुण पत्रकाराला मिळाला, हे माझ्यासाठी अभिमानाचे आणि प्रेरणादायी क्षण आहेत”, असे भावनिक उद्गार विजय कांबळे (शिरूर तालुका अध्यक्ष – द यूवा ग्रामीण पत्रकार संघटना) यांनी काढले.]
नागरगावं प्रतिनिधी:
राज्य शासनाच्या निर्देशानुसार व केंद्र शासनाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत ‘हर घर तिरंगा’ मोहीम नागरगाव ग्रामपंचायतीत उत्साहात राबवली जात आहे. भारताच्या राष्ट्रध्वजाशी प्रत्येक नागरिकाचा भावनिक व देशभक्तीचा संबंध दृढ व्हावा, तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची जाणीव नवीन पिढीपर्यंत पोहोचावी हा या मोहिमेचा उद्देश आहे.
ही मोहीम १५ ऑगस्ट २०२५पर्यंत तीन टप्प्यांत राबवली जात असून, प्रत्येक टप्प्यात ग्रामपंचायत व स्थानिक संस्था वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी नागरगाव ग्रामपंचायत समोर जल्लोषपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. केवळ औपचारिकतेपलीकडे जाऊन, हा सोहळा गावच्या एकतेचा, स्वातंत्र्याच्या बलिदानांचा आणि देशभक्तीच्या भावनेचा जिवंत पुरावा ठरला.
पहिल्या दिवशी गावातील ज्येष्ठ नेतृत्व पुनम भाऊ शेलार व कांतीलाल शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. दुसऱ्या दिवशी गावच्या विद्यमान सरपंच सौ. जयश्रीताई रणदिवे आणि श्रीपती पंडित यांच्या हस्ते सोहळा पार पडला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पत्रकार विजय कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
उपस्थित मान्यवर:
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये सोसायटीचे चेअरमन अशोक खुळे, उपसरपंच अंजनाताई अर्जुन नारनोर, माजी चेअरमन आप्पासाहेब रंणदिवे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष रंजीत शितोळे, सचिव अशोक भोंडवे, भाऊसाहेब साठे, शिवदास साठे, ग्रामसेविका अनिताताई कदम मॅडम ,आविष्कार शेलार, बापू डिखळे, शिवले सर, वाबळे मॅडम, जगदाळे मॅडम, चव्हाण मॅडम यांचा समावेश होता
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीते, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि ‘स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान’ या विषयावर प्रबोधनपर भाषणे घेण्यात आली. मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह आणि वृद्धांच्या डोळ्यात दिसणारे समाधान याने हा कार्यक्रम अधिकच भावस्पर्शी बनला.
नागरगाव ग्रामपंचायतीचा हा उपक्रम केवळ एक सणाचा कार्यक्रम न ठरता, गावातील ऐक्य, सामाजिक जागरूकता आणि राष्ट्रप्रेमाचा जिवंत संदेश देणारा ठरला.
