कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे)
पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, ग्रामपंचायत लोणीकंद आणि थिंकशार्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जैवविविधता उद्यान आणि पाण्याच्या टाकीच्या निर्मितीसाठी भूमिपूजन सोहळा प्रसिद्ध सिने अभिनेते जॅकी श्रॉफ आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
किती झाले लावण्यात आली:
कार्यक्रमाच्या निमित्ताने एक हजार नवीन झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. आतापर्यंत एकूण चार हजार झाडांची लागवड या जैवविविधता उद्यानात पूर्ण झाली आहे. यामध्ये दुर्मिळ औषधी वनस्पती, स्थानिक फुलझाडे आणि सावली देणाऱ्या वृक्षांचा समावेश आहे. विशेषतः जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
अभिनेते सराफ यांनी कोणता संदेश दिला:
या वेळी उपस्थितांना संबोधित करताना जॅकी श्रॉफ यांनी स्वतः झाडे लावून प्रेरणादायी संदेश दिला.
“प्रत्येकाला आयुष्यात श्वास महत्त्वाचा आहे, त्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे आणि त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.
शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी “आई-वडिलांची सेवा करा, अभ्यासावर लक्ष द्या आणि रोज व्यायाम करून शरीर तंदुरुस्त ठेवा” असा मोलाचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांमध्ये रममाण होत, त्यांनी लेझीम पथकासोबत ठेका धरत सर्वांची मने जिंकली.
उपस्थित मान्यवर:
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये थिंकशार्प फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष फड, डॉ. एली ऑर्गॅनिक्स, सरपंच मोनिका कंद, उपसरपंच अतुल मगर, श्रीकांत कंद, अनिल होले, गजानन कंद, ग्रामपंचायत सदस्य, विस्तार अधिकारी मोरे साहेब, ग्रामविकास अधिकारी जालिंदर बोरावणे,आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ शिंदे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन जय कंद यांनी केले.
