शिरूर प्रतिनिधी: दत्तात्रय कर्डिले
वाघाची डरकाळी, भानाचं भूत, जो जो, तिसरा वाटा यासारख्या विविधांगी लेखनाने बालसाहित्यात कसदार लेखन करणारे बालत्याहित्यिक सचिन बेंडभर यांचा मामाच्या मळ्यात हा बालकविता संग्रह बालवाचकांसाठी वाचणाची पर्वणी घेऊन आला आहे. बालवाचकाला वाचनाच्या आनंदासोबतच पुस्तकांशी मैत्रीचा धागा जोडणारा हा कविता संग्रह. कवी सचिन बेंडभर यांचा हा बालकविता संग्रह विविधांगी कवितांची मेजवाणी देणारा आहे. कवितासंग्रहाची सुरुवात शिर्षक कविता मामाच्या मळ्यात या कवितेने झालेली आहे. बालपण खऱ्या अर्थाने अनुभवायला देणारे गाव म्हणजे आजोळ. त्यात मामाचा मळा म्हणजे बालकांसाठी आनंदाची पर्वणीच! अशा मामाच्या मळ्याचे वर्णन करताना कवी लिहितो,
मामाच्या मळ्यात रानमेवा
हवा तेवढा खुशाल खावा
सावलीसाठी वडाचं झाड
आंब्यावरून काढू पाड
या कविता संग्रहामध्ये वाचकाला निखळ आनंद देणार्या अनेक मजेशीर कविता वाचायला मिळतात. ससा कासवाच्या शर्यतीची कथा सर्वांनीच ऐकली आणि वाचलीही असेल. परंतु तो विजयाचा स्वामी या कवितेतून भेटणारा ससा मात्र वेगळा आहे. तो आपल्या शर्यत हरण्याचे चिंतन करताना कवितेत भेटतो. या कवितेत ससा कासवाची शर्यत नाही तर सशाचे आपल्या शर्यत हरण्याची कारणमिमांसा आहे. आपली चूक शोधण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न. तो आपली चूक मान्य करतो का हे तुम्हाला कविता वाचल्यावरच कळेल. पाऊस, पावसाचे गाणे या कविता पावसाच्या सुखद आठवणींनी मनात आनंदाचे तरंग उठवतात. पावसाचे गाणे या कवितेत कवी लिहितो,
पावसाची रिप रिप
झाडांची टीपटीप
गमतीनं झेलून भिजायचं
गारगार वार्यात, थोडंस तोर्यात
भिर भिर भिंगोऱ्या खेळायचं!
या कवितासंग्रहातील कविता वाचकाचे निखळ मनोरंजन करतात तर काही कविता ह्या मनाला चिंतनाच्या डोहात होऊन जातात. रांगत रांगत घरभर फिरणारा चिंटू आपल्या खोड्या घेऊन चिंटू या कवितेत भेटतो. घरातील बालगोपालांचा हक्काचा मित्र म्हणजे आजोबा माझे आजी – आजोबा या कविसेतून वाचायला मिळतात. कवी सोन्या माझा गुणाचा या कवितेत जेवतानाच्या चांगल्या सवयींची आठवण करून देतो. कवी लिहितो,
जेवनाआधी हात धुवा
पानावर कधी नको रडू
जेवताना बाळा कधीच
रूसू नको, नको रडू
प्रयत्नवादाची बिजे बालमनात रूजवणारी प्रयत्नाने मिळते यश ही कविता मानसाने सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, याची शिकवण देते. चांगले विचार आचरणात आणण्याचा कानमंत्र देणारी बिनडोक कोण? या कवितेत कवी लिहितो,
लवकर झोपा लवकर उठा
दररोज करा व्यायाम उठून
आचरणात जर नसेल शिकवण
मग उपयोग काय, डोकं असूण
बर्याचवेळा माणूस डोकं असून ते नसल्यासारखं वागतो. अनेकदा माणसाची कळते पण वळत नाही अशी अवसस्था बघायला मिळते. बरे वाईट कळत असतानाही माणसे चुकीच्या मार्गाने जातात. अशांच्या डोळ्यांत अंजण घालण्याचे काम या कवितेतून कवीने खुबीने केले आहे. जावयाच्या नखर्यांची मजेशीर मेजवानी जावईबापू या कवितेत चाखायला मिळते. कवीने रंजक पद्धतीने दिलेली मनोरंजनाची मेजवानी प्रत्येकाने चाखावी अशीच आहे.
कवी सचिन बेंडभर कवितांमधून मनोरंजनाबरोबरच संस्कार, चांगल्या सवयी, प्रमाणिकपणा, चांगुलपणा यांची रूजवणही करताना दिसतात. सकाळ झाली कवितेत कवी म्हणतो,
नको चहा नको खारी
आई करील शिरा भारी
खुशाल खेळा तासभर
पण शाळेत जायचं वेळेवर
सांगाना कोणी, आशीर्वाद, सुखाचा अर्थ इत्यादी कविता वाचकाला खिळवून ठेवण्यात यशस्वी झाल्या आहेत. या संग्रहातील वृक्षारोपण सोहळा, वृक्ष लावू या कविता बालमनामध्ये निसर्गभान पेरण्याचा प्रयत्न करतात. वृक्षांशी नाते सांगताना वृक्ष लावू या कवितेत कवी लिहितो,
वृक्ष आपले सगेसोयरे
आई बाप बहिण भाऊ
त्यांची माया मिळण्यासाठी
सगळे मिळून वृक्ष लावू.
माणसाने आयुष्यामध्ये नेहमी आनंदी रहावे. यासाठी मन, शरीर सुदृढ असावे. आयुष्यात चांगल्या सवयी अंगिकारण्याचा सल्ला कवी आनंदी राहावे या कवितेतून देतात. मराठी भाषेमध्ये हात संदर्भात अनके वाक्प्रचार आणि म्हणी प्रचलीत आहेत. भाषेची गोडी वाढवणार्या म्हणी आणि वाक्प्रचारांनी सजलेली आपला हात कविता वाचताना म्हणी आणि वाक्यचारांच्या अद्भूत दुनियेची सफर घडते.
देणे हातावर तुरी
सोडू हात दाखविणे
बरे नोहे हातातले
हातोहात लांबविणे
ज्याचे दगडाखाली हात
हात पाय गळालेला
हात हालविण्या त्याला
हात देऊ आधाराला
मामाच्या मळ्यात या कवितासंग्रहातील बालसुलभ झालेली कवितांची मांडणी आणि पुस्तकाची दर्जेदार बांधणी उत्तम दर्जाची आहे. अक्षरांना मिळालेली चित्रकार सागर नेने यांची चित्रे कवितासंग्रहाला अजूनच आकर्षक बनवतात. अशा या बालकविता संग्रहाला बालवाचकांचे भरभरून प्रेम मिळेल हे नक्की.






Users Today : 5
Users Yesterday : 9