शिक्रापूर ग्रामपंचायतच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान
[सरपंच रमेश गडदे यांनी केले मामाच्या मळ्यात या काव्यसंग्रहाचे कौतुक]
शिरूर प्रतिनिधी: दातत्रय कर्डिले
सचिन बेंडभर यांच्या दिलीपराज प्रकाशनने प्रकाशित केलेल्या मामाच्या मळ्यात या काव्यसंग्रहाची निवड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात येत्या जूनपासून पुढील पाच वर्षांसाठी झाल्याने शिक्रापूर नगरीचे सरपंच रमेश गडदे यांच्या शुभहस्ते त्यांचा शिक्रापूर ग्रामपंचायतच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
मुळ पिंपळे जगताप (ता. शिरूर) गावच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बेंडभर यांच्या साहित्यकृतीची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दखल घेत त्यांच्या मामाच्या मळ्यात या काव्यसंग्रहाचा समावेश एम.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात येत्या जूनपासून पुढील पाच वर्षांसाठी केला आहे. या गोष्टीची दखल घेत शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला.
मामाच्या मळ्यात या काव्यसंग्रहातील कविता विद्यार्थ्यांसाठी ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आहे. पुढील पिढीला संस्कारक्षम कवितांची निर्मिती बेंडभर यांच्या लिखाणातून होत असल्याचे सरपंच रमेश गडदे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रकाशकाका वाबळे, अरूणदादा करंजे, महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणचे अध्यक्ष मनोहर परदेशी, कार्याध्यक्ष प्रा. कुंडलिक कदम, लेखक विठ्ठल वळसे पाटील, ग्रंथपाल संतोष काळे, विशाल सांडभोर, डॉ. सुधीर तारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सचिन बेंडभर यांनी शिक्रापूर ग्रामपंचायतचे सरपंच रमेश गडदे व ग्रामपंचायत सदस्यांचे यावेळी आभार मानले.
