पुणे प्रतिनिधी : सागर पवार
पुणे जिल्ह्यात ५ व ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी दरडी कोसळणे, पूल पाण्याखाली जाणे तसेच रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना घडल्या. प्रादेशिक हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तत्काळ सर्व यंत्रणा सज्ज करून महसूल, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य राबविले. या कार्यवाहीत ३० जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली, तर २७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. दुर्दैवाने मावळ तालुक्यातील पाटण येथे घरावर दरड कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील २७ महसूल मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून मावळ तालुक्यात सर्वाधिक २३७.३ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

मावळ तालुक्यात तळेगाव परिसरात पाण्यात अडकलेल्या कंपनीच्या बसमधील ३० कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले. ताजे गावातील डोंगरपायथ्यावरील सुमारे २५० नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसर तसेच लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा सातत्याने कार्यरत आहेत.
हवेली तालुक्यातील भावडी येथे पाच कुटुंबांतील २२ ते २४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. देहू, आळंदी आणि इतर पूरग्रस्त भागांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पूल व धोकादायक मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले. आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे मंदिर परिसर आणि धर्मशाळांमधील भाविकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
मुळशी, भोर, वेल्हे, खेड, पुरंदर तसेच इतर तालुक्यांमध्ये दरडी कोसळलेल्या ठिकाणी तातडीने यंत्रणा पाठवून दगड-माती हटविणे, रस्ते खुले करणे, बॅरिकेडिंग करणे आणि धोकादायक भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची कार्यवाही करण्यात आली. अनेक ठिकाणी संभाव्य धोका ओळखून वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या दुर्घटना टाळण्यात प्रशासनाला यश आले.
पुणे शहरातील सदाशिव पेठेतील धोकादायक इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. पिंपरी-चिंचवड व शिरूर येथील घटनांमध्येही संबंधित यंत्रणांनी तत्काळ प्रतिसाद देत मदतकार्य सुरू केले असून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांनी घेतला परिस्थितीचा आढावा; प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीची सातत्याने माहिती घेत संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या तसेच पुढील दिवशीही पूर्ण सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिवसभर सर्व तालुक्यांतील परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून बचाव व मदतकार्य प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा २४ तास कार्यरत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.




Users Today : 92
Users Yesterday : 92