शिरूर, प्रतिनिधी : सुदर्शन दरेकर
शिरूर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने अत्याधुनिक सुविधांनी युक्त सांस्कृतिक व बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन आज आमदार ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांना देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि समाजप्रबोधनाच्या कार्यातून समाजाला नवी दिशा दिली. त्यांच्या विचारांचा व कार्याचा गौरव व्हावा तसेच भावी पिढ्यांना त्यांच्या योगदानाची प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांच्या नावाने शिरूर शहरात भव्य सांस्कृतिक व बहुउद्देशीय सभागृह उभारणे आवश्यक आहे.
शिरूर शहरात विविध सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर होत असते. मात्र, अशा कार्यक्रमांसाठी सुसज्ज सभागृहाची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे सभागृह उभारल्यास शहरातील नागरिक, विद्यार्थी, कलाकार आणि विविध सामाजिक संस्थांना त्याचा मोठा लाभ होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी शिरूरच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे, नगरसेविका स्वाती साठे, संगीता मल्लाव, स्वीकृत नगरसेवक अभिजीत पाचर्णे, नगरसेविका आयेशा सय्यद, चेतन साठे तसेच शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद कालेवार उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आणि शिरूरच्या सांस्कृतिक विकासाला चालना देण्यासाठी त्यांच्या नावाने बहुउद्देशीय सभागृह उभारण्याची मागणी नागरिकांमधूनही होत आहे.




Users Today : 60
Users Yesterday : 24