पुणे प्रतिनिधी:चेतन पाटील
क्लुज-नापोका, रोमानिया
भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे दर्शन जगभर घडवणाऱ्या कार्यक्रमांमध्ये रोमानियामधील “वार्षिक सांस्कृतिक महोत्सव” विशेष महत्त्वाचा मानला जातो.
या महोत्सवाचे आयोजन दरवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन दिवसांसाठी केले जाते. यंदा योगायोगाने हा दिवस आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी आला आणि त्यामुळे या महोत्सवाला एक वेगळेच अध्यात्मिक व भक्तिमय परिमाण लाभले.
या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध देशांच्या, विशेषतः भारताच्या राज्यांतील कला, परंपरा, अध्यात्म, संगीत, नृत्य, योग, प्राणायाम आणि वेषभूषा यांचे सादरीकरण,गेल्या दोन वर्षांपासून काही तरुणांनी पुढाकार घेतला आणि यंदा प्रथमच महाराष्ट्राच्या संतपरंपरा, वेशभूषा, पोवाडे, अभंग, आणि विशेषतः भजन सेवा प्रभावीपणे सादर केली.
या उपक्रमामागे “भारताची ओळख ही केवळ आधुनिकतेपुरती मर्यादित नसून त्याच्या हजारो वर्षांच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत देखील आहे” ,हा विचार होता.
महाराष्ट्रातील विठ्ठलभक्ती परंपरेचा, संतांचे अभंग, कीर्तन आणि समर्पणभाव यांचा अनुभव देणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
या सेवेमध्ये सहभागी झालेले तरुण हे कोणतेही व्यावसायिक कलाकार नसून, आपल्या कामातून आणि शिक्षणातून वेळ काढून, मनापासून भजन व साधनेचा सराव करणारे होते.
या कार्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान चे धारकरी वल्लभ ढगे यांनी रोमानियातील सर्व तरुणांना कार्यक्रमासाठी एकत्रित केले.
महेश स्वामी, उन्मेश खांदवे, ओंकार महाडिक, संदीप पवार, आकाश गलांडे, ज्ञानेश्वर गलांडे, रवी ढगे, सचिन अढळकर, गणेश पाटील यांचा मोलाचा सहभाग होता.
विशेष उल्लेखनीय म्हणजे कॉस्मिन या रोमानियन युवकाने एका महिन्याच्या अथक सरावानंतर तबल्यावर साथ दिली आणि भारताच्या, विशेषतः महाराष्ट्राच्या संगीत परंपरेबद्दलचे त्याचे प्रेम दाखवले.
या सादरीकरणासाठी रॉबर्ट यांनी वर्षभरासाठी हार्मोनियम वापरासाठी दिली होती .त्यांचे योगदान हे या सेवेचा एक महत्त्वाचा आधार ठरले.
तसेच भारतातून सूर्यकांत ढगे यांनी कार्यक्रमाच्या फ्लेक्सचे सौजन्य केले, आणि काही वाद्य विवेक तोडाकर यांच्या सौजन्याने उपलब्ध झाली.
या संपूर्ण सादरीकरणामुळे रोमानियातील लोक भारावून गेले. विठ्ठल नामाचा गजर, संतांचे अभंग आणि पारंपरिक वेशभूषा पाहून उपस्थित प्रेक्षक थक्क झाले.
कार्यक्रमानंतर अनेकांनी महाराष्ट्राविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली.
याच प्रेरणेने आयोजकांनी पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात, अधिक तयारीने आणि महाराष्ट्राची परंपरा अधिक प्रभावीपणे सादर करण्याचा संकल्प केला आहे.
या सेवेमुळे महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आणि भक्तीभावाचा सुगंध रोमानियाच्या मातीत दरवळला. या कार्याची खरी फलश्रुती म्हणजे ,भारताची आणि विशेषतः महाराष्ट्राची संस्कृती, सीमारेषा ओलांडूनही हृदय जिंकण्यास सक्षम आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
