साहित्य विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारा लेखक : सचिन बेंडभर

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
पुणे जिल्ह्यातील युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांचे मराठी साहित्यात विपूल लेखन आहे. आजपर्यंत त्यांची ५८ पुस्तके प्रकाशित आहेत. यात बालसाहित्य, कथासंग्रह, कवितासंग्रह, कादंबरी आणि अनुवाद असे त्यांचे विविधांगी लेखन आहे.
मुळ पिंपळे जगताप (ता. शिरूर) गावच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बेंडभर यांच्या विविध साहित्य निर्मितीची महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने दखल घेत त्यांच्या

*”कळो निसर्ग मानवा”*

या कवितेची निवड सहावीच्या सुगमभारती पुस्तकात केली आहे.
तसेच मामाच्या मळ्यात या बालकाव्यसंग्रहाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी (एम.ए.) द्वितीय वर्षीच्या अभ्यासक्रमात पुढील पाच वर्षांसाठी समावेश करण्यात आला आहे.
स्वतः लेखक व कवी असून वयापेक्षा विपुल साहित्य संपदा स्वतःच्या नावावर असलेल्या सचिन बेंडभर यांच्या कथा,कविता,लेख,कादंबरी विविध लोकप्रिय वृत्तपत्रातून,मासिकातून तसेच दर्जेदार दिवाळी अंकातून सातत्याने प्रकाशित होत आहेत.
“येते जगाया उभारी” हा प्रकाशित झालेला त्यांचा काव्यसंग्रह राज्यभर गाजत आहे.या काव्यसंग्रहास आजपर्यंत आठ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
स्वतः लिहीत असताना त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना लिहिते केले. मनातल्या कविता,शिंपल्यातले मोती आणि परीसस्पर्श अशी विद्यार्थ्यांची तीन पुस्तके त्यांनी संपादित करीत त्यांनी शाळेत अनेक बालकवी घडवले आहेत.त्यांची येते जगाया उभारी ही कविता, मंथन प्रकाशनाने शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिकेत ज्ञानवंतच्या आठव्या अंकात ५ वर्षासाठी घेतली आहे. अत्यंत कमी वयामध्ये सचिन यांनी बालसाहित्य, कथा, कविता, कादंबरी, अनुवाद या वेगवेगळ्या विभागात लेखन करुन अल्पावधीत साहित्यक्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे.

सचिन यांच्या कथांना जसा विनोदी बाज असतो, तसा कवितांना शेती-मातीचा गंध असतो. रानवारा, गाणं शिवाराचं, येते जगाया उभारी या तीन काव्यसंग्रहातून त्यांनी शेतक-याचे जीवन, त्यांचे दुःख मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

कळो निसर्ग मानवा या कवितेला वढू खुर्द ग्रामस्थांनी शाळेच्या भिंतीवर झळकवले, तर येते जगाया उभारी या कवितेलाही वाबळेवाडी ग्रामस्थांनी शाळेच्या भिंतीवर साकारले आहे.

साहित्यलेखनातील या महत्वपुर्ण योगदानाबद्दल सचिन यांना आजपर्यंत विविध सामाजिक, साहित्यिक संस्थांकडून तेरा पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. तर साहित्य अकादमीकडून राष्ट्रीय सेमिनारसाठी गुजरातमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. हिमाचल प्रदेशातील डलहौजी येथे कथासत्रामध्येही त्यांनी उपस्थिती लावली आहे. शिवांजली साहित्यपीठ जुन्नर येथे होणा-या शिवांजली बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला.

मोबाईल व सोशल मिडियामुळे नव्या पिढीचे वाचन कमी झाले आहे, अशी तक्रार होत असताना सचिन बेंडभरांसारखे कसलेले लेखन करणारे साहित्यिक याच पिढीतून तयार होत आहेत आणि वाचकांचाही त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे, हे मराठी भाषा संवर्धनासाठी आशादायी आहे हे निश्चित.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 5 1 6 7
Users Today : 92
Users Yesterday : 77